
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिवसेना राज्य प्रमुखांना आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २५ वर्षांच्या सेवा कालावधीनिमित्त शिवसेनेकडून २५ राज्यांत रुग्णवाहिका देणार
महिला, युवक आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर स्थानिक पातळीवर काम करण्याच्या सूचना
नवी दिल्ली: शिवसेना हा सर्वसामान्य जनतेचा आणि त्यांच्या हक्कांसाठी लढणारा पक्ष असून पक्षाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने आणि कार्यकर्त्याने आपल्या लोककल्याणकारी कामाच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या माणसापर्यंत शिवसेना पोहोचवावी, असे आवाहन पक्षाचे मुख्य नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. तसेच शिवसेना देशातील २५ राज्यांत रुग्णवाहिका देणार असल्याची घोषणाही शिंदे यांनी यावेळी केली.
नवी दिल्ली येथे आयोजित विविध राज्यांच्या शिवसेना राज्यप्रमुखांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला शिवसेनेचे राष्ट्रीय सचिव कॅप्टन अभिजीत अडसूळ यांच्यासह दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेश, हरियाणा, ओडिशा, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर, पंजाब, उत्तर प्रदेश, पश्चिम उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, राजस्थान आणि हिमाचल प्रदेश या देशातील १५ राज्यांतील राज्यप्रमुखांसह अनेक वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.
गरज पडल्यास ‘शिवसेना स्टाईल’ने आंदोलने
शिक्षण, क्रीडा, रोजगार, महिला, आरोग्य, पाणी, रस्ते आणि कृषी या मुद्द्यांवर प्रभावी पद्धतीने काम करण्याच्या सूचना शिंदे यांनी दिल्या. तसेच, सर्वसामान्य जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी गरज पडल्यास आपापल्या राज्यात ‘शिवसेना स्टाईल’ने आंदोलने करण्याची भूमिका पदाधिकाऱ्यांनी घ्यावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.
*राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन*पक्षाची पकड तळागाळात अजून मजबूत करण्यासाठी येत्या काही महिन्यांत विविध राज्यांमध्ये राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करावे, असेही त्यांनी सांगितले.
संघटनात्मक बांधणी व त्वरित नियुक्त्या
पक्षवाढीला गती देण्यासाठी सर्व राज्यांमध्ये त्वरित पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या पूर्ण कराव्यात. यामध्ये प्रामुख्याने राज्यस्तरीय पदाधिकारी, महिला आघाडी प्रमुख, युवासेना आणि इतर अंगीकृत संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची निवड केली जावी असेही त्यांनी सांगितले.
दोन महिन्यांत कृती आराखडा
सर्व राज्यप्रमुखांनी आपापल्या राज्यांतील राजकीय, सामाजिक परिस्थिती आणि आगामी निवडणुकांच्या दृष्टीने पुढील दोन महिन्यांत ठोस ‘कृती आराखडा’ (Action Plan) पक्ष नेतृत्वाला सादर करावा असेही निर्देश दिले.
नागरी समस्या व स्थानिक प्रश्नांवर भर
पिण्याचे पाणी, रस्ते, आरोग्य सेवा, घनकचरा व्यवस्थापन, शाळांची दुरुस्ती आणि स्वच्छ शौचालये यांसारख्या रोजच्या नागरी समस्या सोडवण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पुढाकार घ्यावा असेही सुचवले.
सदस्य नोंदणी मोहीम
पक्षाची व्याप्ती वाढवण्यासाठी सर्व राज्यांमध्ये व्यापक स्तरावर ‘शिवसेना सदस्य नोंदणी अभियान’ राबवून पक्ष शेवटच्या गावापर्यंत आणि घरापर्यंत पोहोचवावा असेही या बैठकीत शिंदे यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य सामाजिक उपक्रम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आणि त्यांचा २५ वर्षांचा यशस्वी सार्वजनिक सेवा कालावधी विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून भव्य-दिव्य प्रमाणात साजरा करण्याचा निर्धार सर्व राज्यप्रमुखांनी व्यक्त केला. या सेवा सप्ताहादरम्यान देशभरात रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे आणि युवकांसाठी रोजगार मेळावे आयोजित केले जातील. तसेच गोरगरीब विद्यार्थ्यांना वह्या-पुस्तके व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.
“शिवसेनेचे पदाधिकारी हे केवळ राजकारणासाठी नाही, तर समाजकारणासाठी काम करतात. बूथ स्तरापर्यंत पक्षाचे जाळे मजबूत करून जनतेच्या सुख-दुःखात धावून जाणे हेच आपले मुख्य ध्येय असल्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेना राज्य प्रमुखांना सांगितले.








