
एकाच छताखाली शेकडो लाभार्थ्यांना मिळाला शासकीय आधार!
ठाणे: विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना शासकीय लाभ मिळवून देण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, ठाणे आणि तहसील कार्यालय महसूल विभाग,अंबरनाथ यांच्या संयुक्त विद्यमाने अंबरनाथ रोटरी क्लब येथे विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील बांधवांसाठी एक अत्यंत स्तुत्य आणि सामाजिक बांधिलकी जपणारे विशेष शिबिर आज जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने, प्रांताधिकारी विजयानंद शर्मा, तहसिलदार अमित पुरी व इतर अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात पार पडले.
शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील प्रत्येक घटकांपर्यंत,त्यातही विशेष करून विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील बांधवांसाठी सहज, पारदर्शक आणि गतिमान पद्धतीने पोहोचावा, या उदात्त उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त व प्रचंड प्रतिसाद मिळाला.
या विशेष शिबिराच्या माध्यमातून परिसरातील शेकडो नागरिकांना आवश्यक ते शासकीय दाखले, आरोग्य सेवा आणि कल्याणकारी योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळवून देऊन प्रशासनाने संवेदनशीलतेचे एक नवे उदाहरण घालून दिले आहे. विशेष म्हणजे संबंधितांकडे मानव दिनांक पूर्वीचे म्हणजेच 1961 पूर्वीचे पुरावे नसताना स्थानिक चौकशीच्या आधारे जातीचे दाखले वाटप करण्यात आले. प्रशासकीय संवेदनशीलतेचे हे एक उत्कृष्ट उदाहरण ठरले आहे.
शिबिरादरम्यान ५० नागरिकांना जातीचे दाखले, ५० जणांना आभा कार्ड, ६० लाभार्थ्यांना आयुष्मान कार्ड तसेच १६ गरजू कुटुंबांना शिधापत्रिकांचे प्रत्यक्ष वाटप करण्यात आले. याशिवाय उत्पन्नाचे दाखले, अधिवास (डोमिसाईल) प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र आणि २० नागरिकांच्या आधारकार्डांचे अद्ययावतीकरण अत्यंत तत्परतेने पूर्ण करण्यात आले.
केवळ कागदपत्रेच नव्हे, तर आरोग्य आणि रोजगाराच्या दृष्टीनेही हे शिबिर अत्यंत फलदायी ठरले. शिबिरात ५ लाभार्थ्यांची मोफत वैद्यकीय नेत्रतपासणी करण्यात आली, तर कृषी विभाग आणि संजय गांधी निराधार योजनेशी संबंधित अर्जांची प्रक्रिया राबवण्यात आली.
तसेच संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ आणि इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने उपस्थितांना शासकीय स्वयंरोजगार व आर्थिक सहाय्य योजनांचे सखोल मार्गदर्शन करून १० लाभार्थ्यांना योजनांशी थेट जोडण्यात आले.
विविध शासकीय विभागांच्या उत्कृष्ट समन्वयातून पार पडलेल्या या उपक्रमाने प्रशासकीय सेवा नागरिकांच्या दारी आणून खऱ्या अर्थाने समाजातील वंचित घटकांच्या जीवनात समाधानाचा प्रकाश पसरवला आहे.
अंबरनाथमध्ये राबवलेला हा उपक्रम इतर सर्व क्षेत्रांसाठी अत्यंत प्रेरणादायी आणि अनुकरणीय ठरला आहे.
00000000000








