शेतकऱ्यांचा दुष्काळ आणि कुंभाची गर्दी; नाशिकच्या दोन मोठ्या आव्हानांसाठी सरकार सज्ज — शिंदे
पाणी-चारा-टँकरपासून लाखो भाविकांच्या सुविधांपर्यंत प्रशासनाचे युद्धपातळीवर नियोजन

नाशिक : एकीकडे दुष्काळामुळे निर्माण झालेल्या पाणी, चारा आणि टँकरच्या प्रश्नाला सामोरे जाताना दुसरीकडे नाशिक कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सुविधांचे नियोजन अशी दोन मोठी आव्हाने नाशिकसमोर आहेत. या दोन्ही आघाड्यांवर प्रशासन पूर्ण तयारीत असून, कुठेही नियोजनात कमतरता राहणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. ते पत्रकाशी संवाद साधताना बोलत होते.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणी, चारा आणि टँकरचे नियोजन करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार असून धरणांच्या आजूबाजूच्या परिसरात चारा लागवडीचे नियोजन केले जात आहे. जनावरांना चारा उपलब्ध करून देण्यासोबतच टँकरची आवश्यकता असलेल्या भागांची माहिती घेऊन त्यानुसार व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
शेतकऱ्यांच्या मागणीवरून सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर केला असून, या संकटात शेतकऱ्यांच्या मागे सरकार पूर्ण ताकदीने उभे आहे. प्रशासनाने दुष्काळी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी अतिरिक्त मदतीची गरज असेल, तिथे शासनाकडून पूर्ण सहकार्य केले जाईल. डीपीडीसीमधून आवश्यक निर्णय घेण्यासाठी प्रशासनाला मुभाही देण्यात आली आहे.
नाशिकमध्ये कर्जमाफीच्या योजनेअंतर्गत सुमारे १८ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. त्याचवेळी दुष्काळी परिस्थितीत सक्तीची कर्जवसुली थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बँका, मायक्रो फायनान्स संस्था किंवा इतरांकडून शेतकऱ्यांची सक्तीची वसुली होत असल्यास कठोर कारवाई करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
दिंडोरी आणि नाशिक या दोन तालुक्यांचा दुष्काळी उपाययोजनांमध्ये समावेश करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला असून संबंधित विभागानेही सकारात्मक भूमिका घेतली आहे. दुष्काळात मिळणाऱ्या विविध सवलती आणि लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविले जातील. केंद्र सरकारही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पाठीशी असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मदतीचे आश्वासन दिल्याचे शिंदे यांनी सांगितले.
दरम्यान, नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीचाही शिंदे यांनी आढावा घेतला. ३१ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपतींच्या उपस्थितीत होणाऱ्या ध्वजारोहणाची तयारी प्रशासनाने केली असून कुंभाशी संबंधित विविध कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. दोन्ही संबंधित मंत्री स्वतः लक्ष ठेवून असून निर्धारित वेळेत कामे पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
कुंभमेळ्यात लाखो भाविक येणार असल्याने त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी वाहतूक, पाणी, निवास, आरोग्य आणि अन्य मूलभूत सुविधांचे नियोजन केले जात आहे. कुंभमेळ्यातील ५१७ शंखनादाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने घेतली असून, महाराष्ट्रासाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचे शिंदे म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर होणाऱ्या आरोपांवरही शिंदे यांनी विरोधकांना सुनावले. देशाला पुढे नेण्यासाठी पंतप्रधान मोदी काम करत असून, प्रत्येक वेळी त्यांच्यावर आरोप करण्याची सवय विरोधकांनी सोडावी. देशाच्या विकासासाठी आणि सुरक्षेसाठी काम करणाऱ्या नेतृत्वाच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे, असे शिंदे म्हणाले.
२०१४ पूर्वीच्या काँग्रेस-यूपीए सरकारच्या काळातील बॉम्बस्फोट, दहशतवादी हल्ले आणि घोटाळ्यांचा संदर्भ देत शिंदे यांनी मोदी सरकारच्या कार्यकाळातील दहशतवादविरोधी भूमिकेचे समर्थन केले. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात केलेल्या कारवाईचा उल्लेख करत, देशाच्या जवानांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे असल्याचे त्यांनी सांगितले.
दुष्काळाचे संकट मोठे आहे. सरकार कोणत्याही परिस्थितीत हात आखडता घेणार नाही. मात्र सरकारसोबत सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था आणि समाजातील विविध घटकांनीही पुढे येऊन संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन शिंदे यांनी केले.
यावेळी मंत्री गिरीश महाजन, मंत्री दादाजी भुसे, मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार सुहास कांदे, आमदार गोकुळ गीते, आमदार राहुल ढिकले, आमदार देवयानी फरांदे नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त आशिष सिंह, नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, नाशिक मनपा आयुक्त मनिषा खत्री आणि सर्व प्रमुख प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
….








