
पुणे,
पुणे ही देशाची सांस्कृतिक राजधानी असून ज्ञान, कला, संगीत आणि परंपरेचा समृद्ध वारसा जपण्याचे काम पुणेकर सातत्याने करत आहेत. या वारशाचे संवर्धन करणाऱ्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वांचा सन्मान ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
स्वारगेट येथील श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे ३२ व्या पुणे नवरात्र महोत्सवांतर्गत आयोजित ‘महर्षी पुरस्कार’ सोहळ्यात ते बोलत होते. पुणे नवरात्र महोत्सवाचे अध्यक्ष आबा बागुल आणि जयश्री बागुल यांच्यावतीने आयोजित या सोहळ्यात ज्येष्ठ पुरातत्त्ववेत्ते व मंदिर स्थापत्यतज्ज्ञ डॉ. गो. ब. देगलूरकर, ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर आणि गायक-संगीतकार श्रीधर फडके यांना शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
‘‘या तिन्ही मान्यवरांची कार्यक्षेत्रे वेगवेगळी असली तरी भारतीय संस्कृतीचा वारसा समृद्ध करून तो पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे हा त्यांचा समान धागा आहे. त्यांच्या सन्मानामुळे ‘महर्षी पुरस्काराची’च उंची वाढली आहे,’’ असे शिंदे म्हणाले.
डॉ. देगलूरकर यांनी इतिहास, संस्कृती आणि मंदिर स्थापत्याच्या अभ्यासातून मोलाचे योगदान दिले. उषा मंगेशकर यांनी आपल्या स्वरातून कोट्यवधी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले, तर श्रीधर फडके यांनी स्वर्गीय सुधीर फडके अर्थात बाबूजींचा सांगीतिक वारसा जपत त्याला नवा आयाम दिला, असे त्यांनी गौरवोद्गार काढले.
पुणे हे विद्येचे तसेच उत्सवांचे माहेरघर असल्याचे सांगत शिंदे यांनी पुणे नवरात्रौ महोत्सवाच्या ३२ वर्षांच्या सातत्याचे कौतुक केले. यापूर्वी पंडित भीमसेन जोशी, किशोरी आमोणकर, हृदयनाथ मंगेशकर आणि डॉ. विजय भटकर यांसारख्या मान्यवरांचा या पुरस्काराने गौरव झाल्याचे त्यांनी नमूद केले.
‘‘संस्कृती केवळ ग्रंथ किंवा मंदिरात नाही; ती आपल्या जगण्यात, गाण्यात, कलेत आणि विचारांत आहे. आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारताना परंपरेतील मूल्येही जपली पाहिजेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे अभिमानाची बाब असून, मराठीच्या प्रसारासाठी सरकार काम करत आहे,’’ असे शिंदे म्हणाले.
राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बळीराजाच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे असून सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार शेतकऱ्याचा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. दुष्काळग्रस्त कुटुंबांना मदत, महिलांना शिलाई मशीन, मुलींना सायकली आणि सामूहिक विवाहासाठी मदत अशा उपक्रमांचा उल्लेख त्यांनी केला.
कार्यक्रमाला येताना अडथळे आले तरी पुरस्कारार्थींच्या सन्मानासाठी उपस्थित राहण्याचा निर्धार केला होता, असे सांगत ‘‘कमिटमेंट म्हणजे कमिटमेंट, शब्द दिला की शब्द पाळतो,’’ असे शिंदे यांनी नमूद केले. आबा बागुल यांच्या सांस्कृतिक कार्याचे कौतुक करत त्यांनी तिन्ही पुरस्कारार्थींना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या सोहळ्याला केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, उद्योगमंत्री तथा मराठी भाषा मंत्री उदय सामंत, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार श्रीरंग बारणे, सरहद्द संस्थेचे अध्यक्ष संजय नहार, शिवसेना पुणे शहरप्रमुख रवींद्र धंगेकर, नाना भानगिरे, पुणे ग्रामीण जिल्हाप्रमुख रमेशबापू कोंडे यांच्यासह या महोत्सवाचे आयोजक आबा बागुल आणि जयश्री बागुल तसेच हजारो पुणेकर नागरिक उपस्थित होते.
…..









