मुंबई,

शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत माजी खासदार आनंद परांजपे १४ वर्षांनंतर स्वगृही परतले. बाळासाहेब भवन येथे शिवसेना संसदीय गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मंत्री दादाजी भुसे, मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत परांजपे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी माजी खासदार राहुल शेवाळे, शिवसेना सचिव सिद्धेश कदम, रविंद्र फाटक आणि इतर प्रमुख नेते उपस्थित होते.
आनंद परांजपे शिवसेनेत असताना परांजपे आणि शिंदे कुटुंबीयांचे जिव्हाळ्याचे नाते होते. मधल्या काळात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम केले. त्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या मिळाल्या आणि त्या त्यांनी कुठल्याही अपेक्षा न ठेवता पार पाडल्या असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले. आनंद परांजपे यांच्या संघटन कौशल्याचा पक्षाला फायदा होईल,असा विश्वास डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला. शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून दररोज वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. राज्यात पक्षाची ताकद वाढत आहे. राज्यात एसआयआरचे काम सुरू असून शिवसेनेने एक लाखांहून अधिक बीएलओ नियुक्त केल्याचे खासदार डॉ. शिंदे म्हणाले.









