
कोकणातील ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक आणि दर्जेदार शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी ‘डिजिटल’ आणि ‘ग्रीन’ शाळांचा दुहेरी संकल्प मांडत माणगाव तालुक्यातील विविध शाळांना डिजिटल शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.
वनवासी कल्याण आश्रम, महाराष्ट्र संचलित कै. सौ. विजया गोपाळ गांधी अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा, उत्तेखोल येथे हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. आमदार निधीतून आयोजित या उपक्रमांतर्गत शाळांना संगणक (CPU), मॉनिटर, प्रिंटर आणि डिजिटल शिक्षणासाठी आवश्यक आधुनिक साहित्य प्रदान करण्यात आले.
यावेळी बोलताना आमदार ॲड. निरंजन डावखरे म्हणाले की, “आजच्या काळात प्रत्येक शाळा ‘ई-स्कूल’ होणे आवश्यक आहे, मात्र त्यासोबतच त्या ‘ग्रीन स्कूल’ देखील झाल्या पाहिजेत. शाळांनी ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी सोलर प्रणालीचा अवलंब करणे ही काळाची गरज आहे.”
जिल्हा परिषद शाळांच्या विजेच्या बिलाचा भार अनेकदा ग्रामपंचायतींवर पडत असल्याचे लक्षात घेता, या समस्येवर दीर्घकालीन उपाय म्हणून शाळांवर सोलर पॅनेल बसविण्याचे आवाहन त्यांनी केले. ज्या शाळांना सोलर प्रकल्पाची आवश्यकता आहे त्यांनी याबाबत प्रस्ताव सादर करावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडणे म्हणजे सक्षम आणि विकसित भारताच्या निर्मितीसाठी केलेली भक्कम गुंतवणूक असल्याचे नमूद करत, कोकणातील प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक शिक्षणाची समान संधी उपलब्ध करून देण्याचा आपला सातत्यपूर्ण प्रयत्न राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमास भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, भाजयुमो कार्यकर्ते, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, शैक्षणिक प्रतिनिधी तसेच स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोकणातील शैक्षणिक क्षेत्रात डिजिटल व पर्यावरणपूरक बदल घडवून आणण्याच्या दिशेने आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी घेतलेला हा पुढाकार शिक्षणाच्या नव्या पर्वाची नांदी ठरत असून सर्वत्र त्याचे स्वागत होत आहे.










