
आमदार ॲड. निरंजन डावखरे यांची भाजप महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस (कोकण विभाग) पदी नियुक्ती
भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या घोषणेत कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. निरंजन डावखरे यांची महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस (कोकण विभाग) या महत्त्वपूर्ण पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजप ठाणे शहर जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रभारी म्हणून तसेच रत्नागिरी जिल्हा नगर परिषद, नगरपंचायत आणि ठाणे महानगरपालिका निवडणुकांमध्ये प्रभारी म्हणून जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडत आ. डावखरे यांनी संघटनात्मक बळकटीसाठी प्रभावी कामगिरी केली आहे. त्यांच्या कार्यतत्परतेची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर कोकण विभागाची जबाबदारी सोपवली आहे.
या नियुक्तीबद्दल प्रतिक्रिया देताना आमदार ॲड.निरंजन डावखरे म्हणाले, “भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. नितीन नबीन, पक्षश्रेष्ठी तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रविंद्रदादा चव्हाण यांनी माझ्यावर विश्वास ठेवून कोकण विभागाच्या प्रदेश सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवली, याबद्दल मी मनःपूर्वक आभारी आहे. आदरणीय पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजी, केंद्रीय गृहमंत्री मा. श्री. अमितभाई शाह आणि माननीय मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या सक्षम, दूरदर्शी आणि विकासाभिमुख नेतृत्वाखाली पक्षाने दिलेली जबाबदारी पूर्ण निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पार पाडण्याचा माझा प्रयत्न राहील. कोकण विभागात संघटन अधिक मजबूत करणे, कार्यकर्त्यांशी सुसंवाद वाढवणे आणि जनतेचा विश्वास अधिक दृढ करणे, यासाठी मी कटिबद्ध आहे.”
आमदार ॲड. निरंजन डावखरे यांच्या या निवडीमुळे कोकण विभागात भाजप संघटनेला नवे बळ मिळणार असून, आगामी काळात पक्षविस्तार आणि जनसंपर्क अधिक प्रभावीपणे राबवले जातील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.








