
ठाणे, (08) : येत्या सोमवारी श्रीगणेशाचे आगमन होत असून, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेने गणेशमूर्ती विसर्जनाची तयारी वेगाने सुरू केली आहे. गणेश विसर्जनाच्या वेळी भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, तसेच विसर्जन घाटांवर आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा वेळेत उपलब्ध व्हाव्यात, यासाठी सुरू असलेल्या कामांचा महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी प्रत्यक्ष पाहणी दौरा करून आढावा घेतला. विसर्जन घाटांवरील सर्व कामे १३ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करावीत, असे स्पष्ट आदेश त्यांनी महापालिका प्रशासनाला दिले.
या पाहणी दौऱ्यावेळी वागळे प्रभाग समिती सभापती एकता भोईर, माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती सभापती सिद्धार्थ ओवळेकर, नगरसेवक संजय वाघुले, विकास रेपाळे, संध्या मोरे, नम्रता भोसले, नगरअभियंता प्रशांत सोनग्रा, उपनगरअभियंता मोहन कलाल, कार्यकारी अभियंता ऋषिकेश जवळकर, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, मुख्य पर्यावरण अधिकारी विद्या सावंत यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते
महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी मंगळवारी मासुंदा तलाव येथील दत्त घाट, रायलादेवी येथील कृत्रिम तलाव तसेच गायमुख येथील विसर्जन घाटांची पाहणी केली. यापूर्वी शुक्रवारी त्यांनी कोपरी, कोलशेत आणि पारसिक येथील विसर्जन घाटांचीही पाहणी केली होती. या पाहणीदरम्यान घाटांवरील सुरू असलेली कामे, भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधा, सुरक्षेची व्यवस्था, वाहतूक नियोजन आणि स्वच्छतेबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
गणेश विसर्जनाच्या काळात कृत्रिम तलाव, विद्युत व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरेआदी कामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या. भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन घाटांवर सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले.
दीड दिवसांच्या गणेशमूर्तींपासून अनंत चतुर्दशीपर्यंत विविध दिवशी गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. त्यामुळे विसर्जन घाटांवर सातत्याने भाविकांची गर्दी होत असते. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने घाटांच्या परिसरात आवश्यक त्या सुविधा तत्काळ उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना महापौरांनी दिल्या. महापालिकेच्या तलावांना बॅरिकेडिंग करणे, विसर्जन घाटावर आरतीसाठी स्वतंत्र व्यवस्था करणे, पावसाची शक्यता लक्षात घेऊन वेदरशेड उभारणे, तसेच भाविकांसाठी मोबाईल टॉयलेटची सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले. याशिवाय ध्वनिक्षेपक यंत्रणा, माहिती व सूचना फलक, निर्माल्य कलश, पिण्याच्या पाण्याची व स्वच्छतेची व्यवस्था आदी कामेही तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या.
मासुंदा तलाव येथील दत्त घाटावर मोठ्या प्रमाणावर गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. या ठिकाणी ज्या भागात मूर्तींचे विसर्जन केले जाते, त्या ठिकाणचे पाणी बदलण्यात यावे, तसेच घाटाच्या चारही बाजूंना रंगरंगोटी करून परिसर सुशोभित करावा, असे निर्देश महापौरांनी दिले. ठाणे शहरातील मोठ्या गृहसंकुलांमध्येही गणेशमूर्तींचे विसर्जन मोठ्या प्रमाणावर केले जाते. ही बाब लक्षात घेऊन मोठ्या गृहसंकुलांची संख्या विचारात घेऊन आवश्यक त्या ठिकाणी विसर्जन टाक्यांची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, असेही त्यांनी सांगितले.
रायलादेवीसह ज्या-ज्या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत, त्या ठिकाणी भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पुरेशा संख्येने सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या. विसर्जनाच्या वेळी लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांना कोणतीही अडचण होणार नाही, याची विशेष काळजी घेण्यास प्रशासनाला सांगण्यात आले.
गायमुख येथील विसर्जन घाटावर दरवर्षी मोठ्या प्रमाणावर गणेशमूर्ती विसर्जनासाठी येतात. त्यामुळे या ठिकाणी भाविकांसाठी आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. विसर्जनाच्या दिवशी या परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहनांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांशी समन्वय साधून वाहतूक कोंडी होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश त्यांनी संबंधित सहाय्यक आयुक्तांना दिले.स्वीकार केंद्रांचा भाविकांनी लाभ घ्यावा
ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून विसर्जन घाटांबरोबरच विविध ठिकाणी गणेशमूर्ती स्वीकार केंद्रे उभारण्यात आली आहेत. भाविकांनी या केंद्रांचा लाभ घ्यावा आणि पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन घाटांवर मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होते. ही गर्दी लक्षात घेता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आपल्या गणेश विसर्जन मिरवणुका शक्य तितक्या लवकर काढाव्यात. विसर्जनाची प्रक्रिया वेळेत आणि सुरळीत पार पडण्यासाठी महापालिका, पोलीस विभाग आणि वाहतूक विभागाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे मंडळांनी आणि भाविकांनी काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी केले.








