
ठाणे :- ठाणे अंतर्गत मेट्रो प्रकल्प हा लाखो ठाणेकरांच्या हितासाठीच हाती घेण्यात आला असून, त्याबद्दल असलेले सर्व गैरसमज दूर करण्यासाठी व्यापक जनजागृती करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. तसेच या प्रकल्पाबाबत असलेले आक्षेप जाणून घेऊन ते तातडीने दूर करण्यासाठी जागोजागी चर्चासत्रे आयोजित करण्याचे निर्देश त्यांनी शिंदे यांनी या प्रकल्पाची अंमलबजावणी करणाऱ्या महारेल प्राधिकरणाला दिले आहेत. आज याबाबत दृक्श्राव्य माध्यमातून घेतलेल्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले आहेत.
ठाणे शहराच्या वेगवेगळ्या भागातून दररोज रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या लाखो प्रवाशांचा प्रवास अधिक सोपा आणि गतिमान होण्यासाठी ठाणे अंतर्गत मेट्रोला मंजुरी देण्यात आली होती. १२ हजार २०० कोटींच्या निधीला यासाठी मंजुरी देण्यात आली होती. या प्रकल्पातील २६ किलोमीटरचा मार्ग हा जमिनीवरून तर नव्या आणि जुन्या ठाणे स्टेशनला जोडणारा ३ किलोमीटरचा मार्ग हा भुयारी असणार आहे. या मेट्रो मार्गाच्या प्रत्यक्ष कामाला आता सुरुवात झाली असून आतापर्यंत ९.५ टक्के काम पूर्ण झाले आहे. तर मेट्रो स्टेशन आणि कास्टिंग यार्डचे काम प्रगतीपथावर आहे. ही मेट्रो रायलादेवी येथे मेट्रो मार्ग ४ ला तर बाळकुम नाका येथे मेट्रो मार्ग ५ ला जोडली जाणार आहे. त्यामुळे शहरातील वेगवेगळ्या भागातून जुन्या आणि प्रस्तावित असलेल्या नवीन ठाणे स्टेशनकडे येणे अधिक सोपे होणार असून नागरिकांची वाहतूक कोंडीतून मुक्तता होणार आहे. आज झालेल्या बैठकीत प्रकल्पाची सद्यस्थिती जाणून घेत या प्रकल्पाला भेडसावणाऱ्या अडचणी दूर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.
शहराच्या विकासासाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या या प्रकल्पाला एकीकडे प्रत्यक्ष सुरुवात झाली असली, तरीही गेल्या काही दिवसात या प्रकल्पाला वेगवेगळ्या स्तरातून विरोध होऊ लागला आहे. या प्रकल्पाबाबतचे सर्व समज गैरसमज दूर करण्यासाठी या प्रकल्पाबाबतचे सादरीकरण स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांसमोर करण्यात यावे, त्यांचे या प्रकल्पाबतचे आक्षेप समजून घेत ते दूर करावे असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजच्या बैठकीत दिले.
तर हा मेट्रो मार्ग समता नगर, लोकमान्य नगर, आई माता मंदिर या मार्गे शिवाई नगरकडे पुढे न्यावा अशी आग्रही मागणी आमदार प्रताप सरनाईक यांच्याद्वारे या बैठकीत करण्यात आली. तसे केल्यास या भागातील १ लाख नागरिकांना या मेट्रोचा लाभ मिळू शकेल अशी भूमिका त्यांनी मांडली. यावर याबाबत आधीचा मार्ग आणि या नवीन मार्गाची तुलना करून कोणत्या मार्गाने नागरिकांना जास्त फायदा होईल तसेच कोणत्या मार्गावरून मेट्रो गेल्यास कमीत कमी नागरिक बाधित होतील याचा ३ आठवड्यात अभ्यास करून सादरीकरण करावे असे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी महारेल प्राधिकरणाला दिले.
तसेच शहरातील ईडन वूड्स, हिरानंदानी इस्टेट, चेंदणी कोळीवाडा येथील नागरिकांना या प्रकल्पाबाबत असलेले आक्षेप तातडीने सोडवून त्यावर तोडगा काढता येत असेल तर तो तातडीने काढावा असेही शिंदे यांनी या बैठकीत सांगितले. तसेच प्रकल्पाबाबत इतर कुणालाही काहीही आक्षेप असतील तर ते सोडवण्यासाठी जागोजागी चर्चासत्रे आयोजित करावी असेही त्यांनी सुचवले. त्यानुसार आगामी गणेशोत्सवात प्रकल्पाची माहिती देणारे फलक जागोजागी लावावे, आणि लोकांचे आक्षेप दूर करण्यासाठी चर्चासत्रे आयोजित करावीत असेही शिंदे यांनी महारेल प्राधिकरणाला सांगितले.
ठाणे शहर वेगाने वाढत असून, लोकांना एका टोकाहून दुसरीकडे जाणे अधिक सोपे व्हावे यासाठीच अंतर्गत मेट्रो प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाची गरज लक्षात घेऊनच केंद्र सरकारने त्याला मंजुरी दिली आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकल्पाचे उद्घाटन केले असून, त्यांच्या महत्त्वाकांक्षी विकास प्रकल्पाच्या यादीत या प्रकल्पाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत शिंदे यांनी या बैठकीत व्यक्त केले. सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन हा प्रकल्प पुढे न्यावा अशी अपेक्षा खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केली. त्यावर स्थानिक लोकप्रतिनिधींनीच एकत्र येऊन नागरिकांच्या मनातील शंका दूर करायला पुढाकार घ्यायला हवा अशीही अपेक्षा शिंदे यांनी व्यक्त केली. त्यामुळे यापुढे सर्वांना विश्वासात घेऊनच या प्रकल्पातील अडचणी दूर करत तो पूर्ण केला जाईल असे या बैठकीत निश्चित करण्यात आले आहे.
यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे, आमदार ऍड. माधवी नाईक, आमदार रवींद्र फाटक, ठाण्याचे आयुक्त सौरभ राव, महारेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रवण हर्डीकर आणि शहरातील सर्व प्रमुख लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
……









