प्रेस नोट :
दिनांक : ०५ नोव्हेंबर २०२६
ठाण्याच्या म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासाचा मार्ग अखेर मोकळा; भाडेपट्टी कर माफीच्या प्रस्तावासह शिवाई नगरसाठी ऐतिहासिक निर्णयांची घोषणा!
वांद्रे येथे परिवहन मंत्री नामदार प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक संपन्न; हजारो रहिवाशांना दिलासा देणारा प्रशासकीय मार्ग सुकर…

ठाणे : ठाणे शहरातील, विशेषतः १४६ ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील वर्तक नगर, शिवाई नगर, स्वामी विवेकानंद नगर, पवार नगर परिसर इ. गेल्या चार दशकांपासून पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत खितपत पडलेल्या जुन्या म्हाडा वसाहती आणि लेआऊट मधील हजारो नागरिकांच्या हक्काच्या, सुरक्षित आणि आधुनिक निवासाचे स्वप्न साकार होण्याच्या दिशेने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि क्रांतिकारक पाऊल पडले आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्हा पालकमंत्री मा.ना.श्री. प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक यांच्या पुढाकाराने आज वांद्रे येथील म्हाडा मुख्यालयात आयोजित एका विशेष उच्चस्तरीय बैठकीत जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला गती देणारे आणि नागरिकांना मोठा आर्थिक दिलासा देणारे अनेक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले. या बैठकीस म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री संजीव जयसवाल, ठाणे महानगरपालिका आयुक्त श्री. श्री. सौरभ राव, ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ , कोकण म्हाडाचे आयुक्त डॉ. विशाल राठोड, ठाणे महानगरपालिकेचे सहाय्यक संचालक नगररचना अधिकारी श्री. संग्राम कानडे, ठाणे महानगरपालिका नगरसेविका सौ. परिषा सरनाईक आणि शिवाई नगर, ठाणे परिसरातील गृहनिर्माण संस्थांचे प्रमुख प्रतिनिधी व वास्तुविशारद बहुसंख्येने उपस्थित होते.
शिवाई नगर परिसरातील सुमारे ४०-५० वर्षे जुन्या म्हाडा इमारतींच्या पुनर्विकासात निर्माण झालेल्या प्रशासकीय व कायदेशीर अडचणींवर या बैठकीत सखोल मंथन करण्यात आले. जुन्या वसाहतींमधील रहिवाशांवर थकीत व अनियमित भाड्यामुळे पडणारा आर्थिक ताण, भाडेपट्टी कराच्या आकारणीतील तफावत आणि जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावरील मालकी हक्काच्या नोंदी यांसारख्या अत्यंत गुंतागुंतीचे प्रश्ना सोडविण्यासाठी सकारात्मक निर्णय घेण्यात आले. २०१९ पासून त्यांचे बंद असणाऱ्या नोंदी सुरु केल्या. त्याचबरोबर जी व्याजाची रक्कम आकारण्यात आलेली आहे ती रद्द करण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना मंत्री महोदयांनी दिल्या आणि त्याला म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री संजीव जयसवाल यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
विशेषतः शिवाई नगर म्हाडा वसाहतीतील रहिवाशांच्या प्रलंबित प्रश्नांकडे गांभीर्याने पाहत, या परिसरासाठी मंगळवार, १७ नोव्हेंबर २०२६ रोजी शिवाई नगर, ठाणे येथे स्वतंत्र विशेष बैठकीचे आयोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शिवाई नगरमधील भाडेपट्टी भरण्यास इच्छुक असलेल्या सभासदांकडून रक्कम केवळ चेक अथवा डिमांड ड्राफ्टद्वारेच स्वीकारण्यात यावी, तसेच म्हाडाच्या प्रशासकीय विलंबाची कोणतीही दंडात्मक रक्कम सामान्य सभासदांवर लादू नये, अशी स्पष्ट आणि कडक भूमिका मंत्री सरनाईक यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर मांडली. याशिवाय सुमारे चार दशके जुन्या इमारतींची जमिनीची मोजणी पूर्ण होऊन मोजणी शुल्क भरले गेले असले, तरी ७/१२ उताऱ्यावर शासनाऐवजी म्हाडाचे नाव नोंदविण्याची प्रक्रिया अद्याप रखडलेली आहे. ही प्रक्रिया तातडीने मार्गी लावण्यासाठी दिवाळी संपताच कोकण म्हाडा, वास्तुविशारद आणि ठाणे पालिकेच्या नगररचना अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करून शासकीय नोंदींचे हस्तांतरण युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जमिनीच्या नोंदी म्हाडाच्या नावावर वर्ग झाल्यानंतर UDCPR व प्रचलित नियमांच्या चौकटीत राहून पुनर्विकास प्रकल्पांना अतिरिक्त एफएसआय (FSI) मिळवून देण्याच्या मार्गातील सर्व तांत्रिक अडथळे दूर केले जातील. यामुळे प्रकल्पांची आर्थिक व्यवहार्यता वाढेलच, शिवाय स्थानिक रहिवाशांना पुरेशा आकाराची, सर्व सोयीयुक्त आणि दर्जेदार घरे उपलब्ध होण्यास मदत होईल. तसेच, पुनर्विकासासाठी घरे रिकामी करून भाड्याच्या घरात राहणाऱ्या नागरिकांना विकासकांकडून मिळणारे मासिक भाडे वेळेवर व नियमित मिळावे यासाठी कडक नियमावली लागू केली जाईल. प्रकल्पांना अनावश्यक विलंब लावणाऱ्या व रहिवाशांची अडवणूक करणाऱ्या विकासकांवर कायदेशीर कारवाईचे पर्याय चाचपून रखडलेल्या प्रकल्पांना प्रशासकीय गती दिली जाणार असून, यासोबतच रस्ते, पाणी, सांडपाणी व्यवस्थापन आणि पार्किंग यांसारख्या पायाभूत सुविधांचे एकात्मिक नियोजन सुनिश्चित केले जाईल.
ठाण्याच्या नागरी विकासाच्या दृष्टीने या बैठकीचे महत्त्व विशद करताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, “ठाण्यातील म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास हा केवळ विटा-मातीचे नव्याने बांधकाम करण्याचा विषय नसून, गेली चार दशके अत्यंत बिकट परिस्थितीत सुरक्षित निवासाची वाट पाहणाऱ्या हजारो कुटुंबांच्या आयुष्याशी आणि निवाऱ्याशी जोडलेला अत्यंत संवेदनशील प्रश्न आहे. लीज रेंटचा आर्थिक भार हलका करण्यापासून ते ७/१२ उताऱ्यांवरील नोंदी पूर्ण करेपर्यंत प्रत्येक विषयात आम्ही स्वतः लक्ष घालून पाठपुरावा करत आहोत. म्हाडा आणि ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करून सामान्य नागरिकांचे प्रश्न विनाकारण लांबणीवर न टाकता ते तातडीने निकाली काढावेत. शिवाई नगरसह संपूर्ण ठाण्यातील म्हाडा रहिवाशांना सुरक्षित, दर्जेदार आणि कायदेशीरदृष्ट्या भक्कम असणारी हक्काची घरे मिळवून देण्यासाठी आमचे सरकार व मी स्वतः पूर्ण ताकदीने कटिबद्ध आहोत.”
या बैठकीमुळे शिवाई नगर व परिसरातील सर्व म्हाडा वसाहतींमध्ये समाधानाचे वातावरण पसरले असून, पुनर्विकासाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीचा मार्ग सुकर झाला आहे. नगरसेविका सौ. परिषा सरनाईक यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश प्राप्त झाल्याबद्दल शिवाई नगर मधील रहिवाश्यांनी नगरसेविका सौ. परिषा सरनाईक आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आभार मानले.
(मा.ना.श्री. प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक, महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्हा पालकमंत्री, जनसंपर्क विभाग)








