दुष्काळात सरकार आणि शिवसेना दोन्ही मैदानात
दिवाळीचा शिधा घेऊन ठाण्यातून ट्रक थेट दुष्काळग्रस्त भागाकडे रवाना

ठाणे, ता. 20 : महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट असताना शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार आणि शिवसेना अशा दोन्ही पातळ्यांवर मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. सरकारची मदत खात्यात आणि शिवसेनेचा दिवाळीचा शिधा थेट शेतकऱ्यांच्या घरात, असा दुहेरी मदतीचा उपक्रम राबविण्यात येत आहे. ठाण्यातील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निवासस्थान असलेल्या शुभदीप बंगला, येथून दुष्काळग्रस्तांसाठी मदत साहित्याने भरलेले ट्रक रवाना करण्यात आले.
यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक, महापौर शर्मिला पिंपळोलकर, शिवसेना सचिव राम रेपाळे, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, गटनेते पवन कदम, शिवसेना राज्य संघटन प्रमुख आनंद परांजपे, प्रवक्ते राहुल लोंढे आणि शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दसऱ्यानिमित्त नागरिक, पत्रकार बांधव आणि बळीराजाला सुख, समाधान व समृद्धीच्या शुभेच्छा देताना शिंदे म्हणाले, “शेतकऱ्यांची दिवाळी आम्ही काळी होऊ देणार नाही.” मुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील सहकारी, आमदार व खासदारांनी दुष्काळग्रस्त भागात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. दुष्काळ जाहीर करण्याची मागणी मान्य करून महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर केला असून, मदत देताना सरकार हात आखडता घेणार नाही.
5 हजारांची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जात आहे. गेल्या वर्षी अतिवृष्टीने शेतजमीन खरडून गेली, गुरेढोरे आणि उभी पिके वाहून गेली; यंदा दुष्काळाने पिके करपली. मुलांचे शिक्षण, मुलींची लग्ने आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाच्या अडचणीही सरकार समजून घेत असून पूर्ण मदत केली जाईल. केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीही शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
दरम्यान, शिवसेनेच्या माध्यमातून दिवाळीचा शिधा भरलेले शेकडो ट्रक टप्प्याटप्प्याने दुष्काळग्रस्त भागात पाठविले जाणार आहेत. कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या बांधावर, घरात आणि दारापर्यंत पोहोचून साहित्य देणार आहेत. “मदतीचे तोरण हे शिवसेनेचे धोरण आहे. संकट तिथे शिवसेना, आपत्ती तिथे शिवसैनिक हे शिवसेनेचे ब्रीद वाक्य असून, शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांचा वारसा शिवसेना पुढे घेऊन जात असल्याचे स्पष्ट केले.
नवरात्रोत्सवात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी अत्यंत साधेपणाने उत्सव साजरा करत आपली परंपरा आणि संस्कृती जपण्याचे काम केले. त्याचबरोबर या उत्सवाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना मदत करण्याचे कामही करण्यात आले, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
दसरा मेळाव्यातूनही मदत साहित्याचे ट्रक रवाना होणार आहेत. “80 टक्के समाजकारण, 20 टक्के राजकारण” या भूमिकेतून हा उपक्रम सुरू असून, दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नाची जबाबदारीही शिवसेना उचलणार आहे. आमदार, जिल्हाप्रमुख व तालुकाप्रमुखांना अशा कुटुंबांची नोंद घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सरकारची मदत खात्यात आणि शिवसेनेचा शिधा घरात, या माध्यमातून शेतकऱ्यांना संकटात एकटे सोडले जाणार नाही, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.
ठाण्याच्या महापौरांच्या चालकाकडून पत्रकाराला झालेल्या मारहाणीच्या घटनेबाबत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकाराला मारहाण करणे अत्यंत चुकीचे असल्याचे स्पष्ट केले. पत्रकारांच्या पाठीशी आम्ही सदैव उभे राहिलो आहोत. संबंधित व्यक्तीने काही चूक केली असेल, तर त्याची चौकशी करून नक्कीच कारवाई केली जाईल, असेही शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
…..








