
मुंबई, ता. २५ :
मुंबईकरांचे आराध्य दैवत असलेल्या श्री सिद्धिविनायक मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत ५०० कोटी रुपयांच्या विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्याच्या ७८ कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंदिर परिसरातील भाविकांच्या सुरक्षेसाठी आणि सोयी-सुविधांसाठी सरकार कटिबद्ध असल्याचे स्पष्ट करत विकासकामांना अधिक गती देण्याचे निर्देश दिले.

या प्रसंगी बोलताना शिंदे म्हणाले की, सिद्धिविनायक मंदिराच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय त्यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळात देवेंद्र फडणवीस यांच्यासह घेतला होता. मंदिराचे अध्यक्ष सदा सरवणकर आणि विश्वस्त मंडळाने भाविकांच्या सुरक्षेसाठी तसेच वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर आधुनिक सुविधांची गरज मांडल्यानंतर ५०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यातील पहिल्या टप्प्याच्या कामांना आता प्रत्यक्ष सुरुवात होत असल्याचा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले.
“सिद्धिविनायक हे केवळ मुंबईचेच नव्हे तर देशातील सर्वाधिक प्रसिद्ध आणि जागृत देवस्थानांपैकी एक आहे. देश-विदेशातून लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. त्यामुळे मंदिर परिसर अधिक सुरक्षित, सुबक आणि सुविधायुक्त करणे ही काळाची गरज आहे,” असे शिंदे यांनी नमूद केले.
सुमारे २२५ वर्षांचा इतिहास असलेल्या या मंदिराची पायाभरणी १८०१ मध्ये लक्ष्मण पाटील आणि देहूबाई पाटील या दाम्पत्याने केली होती. वाढती भाविकसंख्या आणि सुरक्षा व्यवस्थेच्या गरजा लक्षात घेऊन विकास आराखड्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. मंदिराच्या विकास आरक्षणातील पहिल्या टप्प्यात मंदिराचे प्रवेशद्वार, मंदिराच्या आतील आणि बाहेरील भिंतीना नवे दगड बसवणे, मंदिर परिसरात १२४ वाहन क्षमतेचे दुमजली पार्किंग तयार करणे अशा काही कामांचा समावेश असेल.
महायुती सरकार धार्मिक आणि आध्यात्मिक केंद्रांच्या विकासाला प्राधान्य देत असल्याचे सांगताना शिंदे यांनी पंढरपूर विकास आराखडा, भीमाशंकर तसेच इतर प्राचीन देवस्थानांच्या विकास प्रकल्पांना दिलेल्या मंजुरीची माहिती दिली. तसेच ‘अ’ वर्गातील मंदिरांसाठी पूर्वी असलेला दोन कोटी रुपयांचा निधी वाढवून पाच कोटी रुपये करण्यात आल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अयोध्येतील राम मंदिर, काशी विश्वनाथ कॉरिडॉर आणि उज्जैन महाकालेश्वर मंदिराचे सुशोभीकरण करण्यात आले असून त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील प्रमुख देवस्थानांचा विकास करण्यात येत असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
सिद्धिविनायक मंदिराचा विकास आराखडा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आला असून त्यानुसार कामे वेगाने पूर्ण केली जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने गेल्या बारा वर्षांत साधलेल्या प्रगतीचाही शिंदे यांनी गौरव केला. भारताची अर्थव्यवस्था जगातील चौथ्या क्रमांकावर पोहोचल्याचे नमूद करत विकसित भारत २०४७ या संकल्पनेच्या दिशेने देश वेगाने वाटचाल करत असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला आणि दुर्बल घटकांसाठी राबविण्यात आलेल्या विविध योजनांमुळे कोट्यवधी नागरिकांचे जीवनमान उंचावल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे केलेले कौतुक हे भारताच्या वाढत्या जागतिक प्रभावाचे प्रतीक असल्याचे शिंदे म्हणाले. विकसित भारत २०४७ या संकल्पनेद्वारे भारताला महासत्ता बनविण्याच्या मोदींच्या दूरदृष्टीपूर्ण रणनीतीमुळे जगातील प्रमुख राष्ट्रे भारताकडे नव्या विश्वासाने पाहत आहेत. विविध जनकल्याणकारी योजनांमुळे कोट्यवधी नागरिकांचे जीवनमान उंचावले असून जागतिक स्तरावर भारताची प्रतिष्ठा अधिक मजबूत झाली असल्याचे त्यांनी नमूद केले.
“सिद्धिविनायक मंदिराचा विकास पूर्ण झाल्यानंतर भाविकांना अधिक चांगल्या सुविधा मिळतील आणि मुंबईच्या वैभवात आणखी भर पडेल,” असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
याच कार्यक्रमात मंदिर समितीच्या वतीने गरजू व्यक्तींना सायकल आणि इंडक्शन कुकरचे वाटप उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर,आमदार प्रसाद लाड, मुंबईच्या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, कोषाध्यक्ष पवन त्रिपाठी, विश्वस्त राहुल लोंढे, मीनाताई कांबळी, जितेंद्र राऊत, जगदीश शेट्टी आणि इतर सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच हजारो भक्तगण उपस्थित होते.










