
ठाणे / मुंब्रा : NEET पुनर्परीक्षेत ५४४ गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या मुंब्र्यातील कु. आयशा अनीस हिचा कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार तथा भाजपचे प्रदेश सरचिटणीस ॲड. निरंजन डावखरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आयशाच्या जिद्दीचे कौतुक करत तिच्या पुढील वैद्यकीय शिक्षणासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना डावखरे यांनी NEET पेपरफुटी प्रकरण गंभीर असल्याचे सांगत, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही माफी नसून दोषींवर कठोर कारवाई होईल, असे स्पष्ट केले. विद्यार्थ्यांच्या हितासाठी झालेल्या आंदोलनाची दखल घेण्यात आली असून या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपविण्यात आली आहे. तसेच दोषींना जलद शिक्षा मिळावी यासाठी फास्ट-ट्रॅक न्यायालयांच्या माध्यमातून प्रक्रिया गतीमान करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी केंद्र सरकार आवश्यक पावले उचलत असल्याचा दावा करत त्यांनी सार्वजनिक परीक्षा (अनुचित साधनांचा प्रतिबंध) अधिनियम, २०२४ अधिक प्रभावी करण्यासाठी सुधारणा विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याचेही नमूद केले.
आंदोलनासंदर्भातील प्रश्नावर उत्तर देताना डावखरे म्हणाले की, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई सुरू असून विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य देणे आवश्यक आहे. या विषयात राजकारण न करता विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी सर्वांनी सकारात्मक भूमिका घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
सत्कारानंतर आयशा अनीस हिनेही माध्यमांशी संवाद साधला. पहिल्या परीक्षेत तिला ५९२ गुण मिळाले होते. पुनर्परीक्षेची वेळ आल्यानंतर शासनाने या प्रकरणात कारवाई सुरू केल्याने आपण अभ्यासावर लक्ष केंद्रित केले आणि ५४४ गुणांसह यश मिळविल्याचे तिने सांगितले. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भावना योग्य असल्या तरी शासनावर विश्वास ठेवून अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहनही तिने केले.
आयशाचे यश हे केवळ तिच्या कुटुंबाचे नसून संपूर्ण मुंब्रा आणि ठाणे जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगत, कठीण परिस्थितीतही आत्मविश्वास कायम ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांकडून इतरांनी प्रेरणा घ्यावी, असे डावखरे यांनी नमूद केले.
यावेळी आयशाच्या कुटुंबीयांसह मुंब्रा-कौसा मंडळाचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.










