आमदार संजय केळकर यांच्या पाठपुराव्यानंतर रहिवाशाला दोन महिन्यांत मिळाला न्याय

ठाणे: गेली पाच वर्षे एसआरए योजनेतील हक्काच्या घरासाठी महापालिका आणि एसआरए कार्यालयाचे उंबरठे झिजवणाऱ्या रहिवाशाला अखेर आमदार संजय केळकर यांनी दोन महिन्यांत न्याय मिळवून दिला. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या कारभाराचे पुन्हा वाभाडे निघाले आहेत.
पाचपाखाडी आनंद सावली प्रकल्पातील संजय गुरव या रहिवाशाने भाजपच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या ११४व्या उपक्रमात आमदार संजय केळकर यांची भेट घेत त्यांचे आभार मानले. श्री. गुरव हे गेली पाच वर्षे हक्काच्या घरासाठी महापालिका आणि एसआरए कार्यालयाचे उंबरठे झिजवत होते. एसआरए अधिकारी विविध त्रुटी काढत होते. दरम्यान त्यांनी न्यायालयातही धाव घेतली होती. न्यायालयाने त्यांच्या बाजूने दिलेल्या आदेशाला देखील एसआरए अधिकारी जुमानत नसल्याने श्री.गुरव हतबल झाले होते. अखेर त्यांनी दोन महिन्यांपूर्वी आमदार केळकर यांच्याकडे धाव घेतली. श्री.केळकर यांनी तातडीने या प्रकरणी लक्ष घालून अधिकाऱ्यांना सूचना केल्या. अखेर श्री.गुरव यांना घर वितरित करण्यात आले.
याबाबत बोलताना श्री. केळकर यांनी सांगितले की, अधिकारी नागरिकांना कसे जुमानत नाहीत, याचे हे उत्तम उदाहरण आहे. एसआरए प्रकल्पात बहुतांशी विकासक रहिवाशांना उद्ध्वस्त करत आहेत. आणि अधिकारी जणू विकासकांच्या बाजूनेच काम करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोखरण २ येथील सुमारे दोन हजार कुटुंबांच्या हक्काच्या घरांसाठी संबंधित अधिकाऱ्यांसोबत सोमवारी बैठक आयोजित केली असल्याचे श्री.केळकर यांनी सांगितले. हजुरी येथील कोळीवाडा गावठाण परिसर बेकायदेशीरपणे क्लस्टर योजनेत समाविष्ट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याबाबत अधिकाऱ्यांना स्पष्ट समज दिली असून रहिवाशांच्या मनाविरुद्ध जबरदस्तीने क्लस्टर योजना राबवू नका, अशा सूचना दिल्या आहेत, अशी माहिती श्री. केळकर यांनी माध्यमांना दिली.
पॉंजी योजनेत सुमारे २५० कोटींचा घोटाळा झाला असून ठाण्यातील ४०० गुंतवणूकदार नागरिकांची फसवणूक झाली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने कंपनीच्या मालमत्ता ताब्यात घेतल्या असल्या तरी गुंतवणूकदारांना त्यांची रक्कम मिळालेली नाही. या मालमत्तांची यादी घेऊन लवकरच गृह सचिवांना भेटणार आहे. गुंतवणूकदारांना दिलासा मिळेपर्यंत पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे श्री. केळकर यांनी सांगितले.
या उपक्रमात कंत्राटी कामगारांवर होत असलेल्या अन्यायाचा प्रश्नही उपस्थित झाला. या प्रकरणी कामगार उपायुक्तांना संबंधित कंत्राटदारांना कारणे दाखवा नोटीस बजावून काळ्या यादीत टाकण्याच्या सूचना केल्याचे श्री. केळकर यांनी सांगितले.
यावेळी नगरसेवक दीपक जाधव, सुनील नरे, योगेश भंडारी, गणेश राजे, राजेश गाडे, मत्स्यगंधा पवार, रक्षा यादव आदी उपस्थित होते.











