
ठाणे : टेनिस क्रिकेट स्पोर्ट फेडरेशन ऑफ इंडिया (ITCSF) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “President Cup India – 2026” या देशव्यापी टेनिस क्रिकेट स्पर्धेचा भव्य शुभारंभ आज, गुरुवार ३१ मार्च २०२६ रोजी ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे मोठ्या दिमाखात पार पडला. या स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते, सुपरस्टार सलमान खान यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मैदानात हजारो क्रिकेट प्रेमी उपस्थित होते.
टेनिस क्रिकेटपटूना एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध व्हावे या हेतूने आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा भारतात विविध देशांमध्ये वर्षातून तीन वेळा आयोजित केली जाईल अशी घोषणा यावेळी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि आयटीसीएसएफचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी केली. यावेळी खेळाडूंनी एकच जल्लोष करत या निर्णयाचे स्वागत केले.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांशी संवाद साधताना या उपक्रमाचे कौतुक केले. तर अशा पद्धतीचे उपक्रम आयोजित होणे गरजेचे असल्याचे मत यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केले. या निमित्ताने देशातील १६ टीम ठाण्यात आल्या असून त्यांच्यात हे सामने रंगणार आहेत. या संघातील खेळाडूंचे तमाम ठाणेकरांच्या वतीने स्वागत करतो. या निमित्ताने दादोजी कोंडदेव स्टेडियम क्रीडाप्रेमींनी खचाखच भरले असून, अभिनेते सलमान खान यांनी या सोहळ्याची शोभा अधिकच वाढवली असल्याचे सांगितले. क्रिकेट है तो विकेट है, मी देखील २०२२ साली एक मोठी विकेट काढली होती. आजही काही जण खेळण्याचा प्रयत्न करतात पण खेळू शकत नाहीत कारण माझी फिल्डिंग अजूनही टाईट आहे असे सांगितले. हे स्टेडियम आमच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांमुळे उभे राहिले असून ठाणे शहराची ती शान आहे.
या स्टेडियम विकासासाठी आजवर ५५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले. असल्याची त्यांनी यावेळी सांगितले. तसेच या स्पर्धेच्या आयोजनासाठी प्रयत्न केलेल्या सर्वांचे आभार मानून या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांना शुभेच्छा दिल्या.
तर यावेळी अनेक वर्षानी आपण ठाण्यात आलो आहोत. ठाण्यात येऊन खूप उत्तम वाटले. आज ठाणे हे बांद्र्या पेक्षा ही अधिक उत्तम दिसू लागले असल्याचे अभिनेते सलमान खान यांनी सांगितले.
टेनिस क्रिकेट खेळाडूंना अधिक चांगले व्यासपीठ मिळावे. आर्थिक दृष्टया देखील आपली आवड जोपासण्यासाठी मनोबल मिळावे आणि अधिक उत्तम क्रिकेट खेळता यावे यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तसेच याच हेतून स्पर्धेची विजेती रक्कम देखील १ कोटी करण्यात आली असल्याचे ही खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.
स्पर्धेच्या पहिल्या दिवशी म्हणजेच आज 31 मार्च रोजी महाराष्ट्र वॉरियर्स विरुद्ध कर्नाटक रॉयल किंग्स हा पहिला सामना पार पडला.
कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून या भव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ते टेनिस क्रिकेट स्पोर्ट फेडरेशन ऑफ इंडिया (ITCSF) चे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली टेनिस क्रिकेटला राष्ट्रीय स्तरावर संघटित व व्यावसायिक ओळख मिळवून देण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे.
आयटीसीएसएफच्या माध्यमातून देशभरातील टेनिस क्रिकेट खेळाडूंना मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेची सुरुवात करण्यात येत आहे. आज ३१ मार्च ते ५ एप्रिल या कालावधीत देशातील विविध राज्यांतील १६ संघांमध्ये ही स्पर्धा रंगणार असून, मोठ्या संख्येने खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे. ‘President Cup India’ स्पर्धेची बक्षीस रक्कम ४० लाखांवरून थेट १ कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा ऐतिहासिक निर्णय आयटीसीएसएफने घेतला आहे.
टेनिस क्रिकेट हा सर्वसामान्य तरुणांचा खेळ असून, ग्रामीण व शहरी भागातील अनेक प्रतिभावान खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर चमकण्याची ही सुवर्णसंधी ठरणार आहे. उद्घाटन सोहळ्याला क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, विविध संघांचे खेळाडू तसेच मोठ्या संख्येने क्रिकेटप्रेमी उपस्थित राहणार असून, प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला आहे.
यावेळी मंत्री उदय सामंत, प्रताप सरनाईक, खासदार श्रीरंग बारणे, नरेश म्हस्के, डॉ.ज्योती वाघमारे, ज्येष्ठ क्रीडा समीक्षक सूनंदन लेले यांच्यासह सर्व संघाचे अध्यक्ष, खेळाडू आणि मान्यवर मंडळी उपस्थित होते.
चौकट
या स्पर्धेत महाराष्ट्र वॉरियर्स, पुणे पायराइट्स, बिहार ब्लास्टर्स, दिल्ली स्ट्राइकर्स, ड्रीम हरियाणा रॉयल्स, गुजरात लायन्स, कर्नाटक रॉयल किंग्स, केरळ वॉरियर्स, कोलकाता रायडर्स (वेस्ट बंगाल), मध्य प्रदेश टायगर्स, पूर्वांचल पँथर्स, राजस्थानी योद्धाज, रॉयल चॅलेंजर्स गोवा, सुप्रीम सुपर किंग्स (तमिळनाडू), यूपी नाइट्स आणि उत्तराखंड टायगर्स असे एकूण १६ संघ सहभागी होणार आहेत. विजेत्या संघाला १ कोटी रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार असून, स्पर्धेत कोट्यवधी रुपयांची बक्षिसे वितरित केली जाणार आहेत.
चौकट
स्पर्धेतील विजेत्या संघाला तब्बल १ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले असून, उपविजेत्या संघाला ५० लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. टेनिस क्रिकेट क्षेत्रात एवढ्या मोठ्या प्रमाणावर बक्षिसे जाहीर होणे ही विशेष बाब मानली जात आहे. याशिवाय, स्पर्धेतील वैयक्तिक कामगिरीलाही विशेष प्रोत्साहन देण्यात आले आहे. सर्वोत्तम फलंदाज, सर्वोत्तम गोलंदाज तसेच २३ वर्षांखालील उदयोन्मुख खेळाडू यांना प्रत्येकी आकर्षक बाईक देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट आणि सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या खेळाडूस “मॅन ऑफ द सिरीज” म्हणून भव्य महिंद्रा थार ही चारचाकी गाडी प्रदान करण्यात येणार आहे.दरम्यान, प्रत्येक सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंसाठी “मॅन ऑफ द मॅच” हा पुरस्कार ठेवण्यात आला असून, त्यासाठी दररोज ५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक व आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहेत.
स्पर्धेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रेक्षकांसाठी ठेवण्यात आलेली बक्षिसे. लकी ड्रॉच्या माध्यमातून तीन इलेक्ट्रिक बाईक्स जिंकण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच प्रत्येक सामन्यानंतर १० हजार रुपयांचे रोख बक्षीस आणि १० हजार रुपयांचे रिटेल व्हाउचर्स देण्यात येणार आहेत.
….









