Press note

घोडबंदर रोडवरील गंभीर आणि जीवघेण्या परिस्थितीबाबत आज सामाजिक कार्यकर्ते अजय जेया यांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना औपचारिक निवेदन दिले. सततचे अपघात, अपूर्ण कामे, चुकीचे बॅरिकेडिंग, खड्डे, मार्गांची चुकीची मर्जिंग आणि मेट्रोच्या कामातील अव्यवस्था यामुळे हा रस्ता नागरिकांसाठी मृत्यूमार्ग ठरत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. अनेक तक्रारी, आंदोलने आणि ‘मशाल यात्रा’नंतरही परिस्थितीत सुधारणा दिसत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
जेया म्हणाले की, जिल्हाधिकारी सार्वजनिक तक्रारींवर कार्यवाही करणारे सर्वोच्च अधिकारी असल्याने त्यांनी आता कार्यालयात बसून नव्हे तर प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून नागरिकांशी संवाद साधावा. त्यांनी स्पष्ट मागणी केली की जिल्हाधिकाऱ्यांनी ठराविक दिवस आणि वेळ जाहीर करावी, ज्यादिवशी सर्व विभाग प्रमुख नागरिकांसोबत घोडबंदर रोडवर येऊन पाहणी करतील. नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित राहतील आणि त्याच ठिकाणी तात्काळ निर्णय व आदेश देणे आवश्यक आहे. “राजकारण्यांना उत्तर देण्यापेक्षा अधिकारी थेट नागरिकांशी बोलले तरच खरी accountability येईल,” असे ते म्हणाले.
माध्यमांशी बोलताना अजय जेया यांनी इशारा दिला की, जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश न दिल्यास ते घोडबंदर रोडवर आमरण उपोषणास बसतील. “रस्त्याचे खरे मालक नागरिक आहेत. लोक रोज या धोकादायक रस्त्यावरून जातात; त्यामुळे आता शासकीय कर्मचाऱ्यांनीही रस्त्यावर उतरून वास्तव पाहणे गरजेचे आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
हा कोणताही राजकीय उपक्रम नसून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठीचा आणि मानवी जीव वाचवण्यासाठीचं जनआंदोलन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.










