
आम्ही घरून नाही, तर फील्डवर काम करणारे..पण काही जण उठसूट लंडनच्या फेऱ्या मारूनही येताना रिकाम्या हातांनी परततात.
मुंबई मनपा हरल्यानंतर फोडायला ‘हंबरडा’ शिल्लक ठेवा… पूरग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारकडून भरीव मदत केल्याची शिंदेंची ग्वाही…
उबाठा प्रमुखांच्या टीकेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रत्युत्तर
छत्रपती संभाजीनगर मधील कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आदेश
छत्रपती संभाजीनगर :
आम्ही फक्त पोस्टरवर नाही, तर फील्डवर काम करणारे आहोत. त्यामुळेच ब्रिटनचे पंतप्रधान आमच्याशी बोलतात असे सांगतानाच
काही जण लंडनच्या फेऱ्या मारून सगळे तिथेच ठेवून आल्याने रिकाम्या हातांनी परततात अशी टीका करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठा प्रमुखांनी केलेल्या टीकेला जशास तसे प्रत्युत्तर दिले. छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
काही जण हंबरडा फोडायची भाषा करत असले तरीही त्यांना शेतकऱ्यांची साथ मिळणार नाही, कारण विरोधकांच्या अपेक्षेपेक्षा जास्त अशी ३२ हजार कोटींची मदत आपण पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर केली असल्याचे सांगितले. तसेच २०२२ साली खुर्ची गेल्यावर, त्यानंतर लोकसभा निवडणुकीत लोकांनी पाठ फिरवल्यावर, विधानसभा निवडणुकीत १०० जागा लढवून वीसच जिंकल्यावर त्यांनी हंबरडा फोडला होता. त्यामुळे आता मुंबई मनपा निवडणुका जवळ येत असून या निवडणुकीत पराभव झाल्यावर फोडण्यासाठी थोडा हंबरडा शिल्लक ठेवावा अशी टीका शिंदे यांनी यावेळी केली.
“आपला पक्ष हा मालक-नोकरांचा नाही, तर कार्यकर्त्यांचा आहे. वशेलीबाजीतून नव्हे तर कामातून कार्यकर्ते पुढे जातात. मी मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री म्हणून नव्हे, तर कार्यकर्ता म्हणूनच काम करत आहे.” स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सवंगडी मानले, घरगडी नाही. काही लोक मात्र स्वतःला मालक आणि कार्यकर्त्यांना नोकर समजतात.”
राज्यातील आपत्ती, पूरस्थिती किंवा अडचणीच्या काळात शिवसेना नेहमी पुढे आली असल्याचे सांगून शिंदे म्हणाले, “सांगली, कोल्हापूर, चिपळूण, केरळ, उत्तराखंड— कुठेही संकट आले की, मी स्वतः छातीचा कोट करून पुढे गेलो असल्याचे सांगितले.”
राज्यात गेल्या अडीच वर्षात केलेल्या विकासकामांचा उल्लेख करत त्यांनी, या काळात राज्यात अनेक प्रकल्प आणले. पूरग्रस्त भागांसाठी ३२ हजार कोटींचे पॅकेज दिले. मराठवाडा वॉटरग्रीड प्रकल्पाला चालना दिली. महायुतीची पहिली कॅबिनेट बैठकही मराठवाड्यात झाली होती त्यातही अनेक निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणी केली असल्याचे सांगितले.”
“शिवसेना ही आता आपल्याला घराघरात पोहोचवायची आहे. शाखाप्रमुखांपासून प्रत्येक कार्यकर्त्याने हिंदुत्वाची शान राखण्याची आणि विरोधकांना चारी मुंड्या चित करण्याची शपथ घ्यावी. महायुतीचा झेंडा स्वराज्य संस्थांवर फडकवायचा आहे,” अशी गर्जना शिंदे यांनी केली.
“बुथ प्रमुख आणि गटप्रमुख हाच उमेदवाराला विजयी करतो. त्यांनी जर ठरवलं, तर तुमचा कार्यक्रम यशस्वी होतो; आणि ठरवलं नाही, तर कार्यक्रम बिघडवण्याची ताकदही त्यांच्यात आहे,” असे एकनाथ शिंदे यांनी सांगत पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांचे महत्त्व अधोरेखित केले.
आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा उल्लेख करत त्यांनी कार्यकर्त्यांना मतदारयादीच्या अभ्यासाचे महत्त्व पटवून दिले. “यादी भगवद्गीतेसारखी वाचा. नावं नीट तपासा, चुकीची नावं असतील तर नुकसान आपलंच होईल. मतदारयादी बरोबर असेल, तर निकाल संध्याकाळीच समजेल,” असे त्यांनी सांगितले.
निवडणुकांसाठी विशेष ॲप लाँच केल्याची माहिती देत शिंदे म्हणाले की, “प्रत्येक शाखाप्रमुख, गटप्रमुख, आमदार, खासदारांनी प्रत्यक्ष सर्वेक्षण करावे. मृत व्यक्तींची किंवा डबल नावे असल्यास दुरुस्ती करा. डोळ्यात तेल घालून काम करा असे सांगितले.”
महायुतीच्या एकजुटीवर भर देत शिंदे म्हणाले, “लोकसभा आणि विधानसभा आपण महायुती म्हणून लढलो. आता स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही महायुतीनेच लढायच्या आहेत. कोणतेही कृत्य करून मतभेद निर्माण होऊ देऊ नका. आपल्या पक्षाचा मान-सन्मान मी राखीन असे नमूद केले.”
शेवटी शिंदे म्हणाले, “शिवसेना ही घराघरात पोहोचवायची आहे. शाखाप्रमुखांपासून प्रत्येक कार्यकर्त्याने हिंदुत्वाची शान राखण्याची आणि विरोधकांना चारी मुंड्या चित करण्याची शपथ घ्यावी.” आणि महायुतीचा झेंडा स्वराज्य संस्थांवर फडकवावा असे आव्हान त्यांनी केले.
यावेळी सामाजिक न्याय आणि संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे, आमदार प्रवीण जयस्वाल, आमदार विलास भुमरे, आमदार प्रा. रमेश बोरनारे, आमदार संजना जाधव, शहरप्रमुख राजेंद्र जंजाळ आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.









