
तरुणाईने इतर व्यसने दूर ठेवून योगाभ्यासाचे व्यसन धरावे..
जागतिक योग दिनानिमित्त ‘योगा बाय द बे’ उपक्रम उत्साहात साजरा
डॉ.श्रीकांत शिंदे यांनी केला मरीन ड्राईव्हवर योगाभ्यास
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून उपक्रमाला शुभेच्छा
मुंबई :- जागतिक योग दिनाच्या निमित्ताने टाईम्स ऑफ इंडिया, योगा इन्स्टिट्यूट, इंडियन कोस्ट गार्ड आणि
शिवसेना प्रवक्त्या शायना एनसी यांच्या पुढाकाराने ‘योगा बाय द बे’ या उपक्रमाचे मरीन ड्राईव्हवर आयोजन केले होते. यंदा या उपक्रमाचे अकरावे वर्ष असून यानिमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे या उपक्रमाला उपस्थित राहिले. यावेळी डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सर्वांसोबत योगाभ्यासही केला तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने जागतिक योग दिन जगभर साजरा होऊ लागला असल्याचे सांगितले. आज योगाचे महत्त्व सगळ्यांना पटल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात सर्वजण योग दिन उत्साहात साजरा करत आहेत. पंतप्रधान मोदीही 3 लाख विद्यार्थ्यांसोबत विशाखापट्टणम येथे योग दिन साजरा करत आहेत. अनेक असाध्य रोगांना आपल्यापासून दूर ठेवण्याचे सामर्थ्य योगात आहे. मात्र त्यासाठी दररोज योगाभ्यास करणे गरजेचे आहे. त्यामुळे आजच्या तरुणाईने इतर व्यसने करण्यापेक्षा योगाचे व्यसन धरायला हवे अशी अपेक्षा यावेळी बोलताना व्यक्त केली. तसेच या उपक्रमाच्या यशस्वी आयोजन केल्याबद्दल शिंदे यांनी शिवसेना प्रवक्त्या शायना एनसी आणि इंडियन कोस्ट गार्डला शुभेच्छा दिल्या.
यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेना प्रवक्त्या शायना एनसी, इंडियन कोस्ट गार्डचे अधिकारी आणि ख्यातनाम फिटनेस ट्रेनर मिकी मेहता योग शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
एकनाथ शिंदे यांच्या यशस्वी उठावाला 3 वर्षे पूर्ण
आजच्या तारखेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आयुष्यात वेगळे महत्त्व असल्याने याबाबत पत्रकारांनी त्यांना विचारले असता, या निमित्ताने हा आगळा वेगळा ‘योग’ जुळून आला असल्याचे मत त्यानी व्यक्त केले. तीन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी आम्ही असा योगा केला जो खरेतर मेरेथॉन योगा होता. मात्र त्याने राज्याचे भवितव्य बदलले. आज मरीन ड्राईव्ह, कोस्टल रोड, अटल सेतू, मेट्रो मार्ग, बुलेट ट्रेन प्रकल्प, समृद्धी महामार्ग यासारखे राज्याचे भवितव्य बदलणारे प्रकल्प घडले ते त्या एका उठावामुळे प्रत्यक्षात येऊ शकले असल्याचे मत त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.