
अहिल्यानगर (शेवगाव), ता. 29 : शेवगावमध्ये शिवशक्ती आणि जनशक्ती एकत्र आल्याने विकासाची नवी शक्ती निर्माण झाली असून या लढाईत जनशक्तीचाच विजय होणार, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. विरोधकांना कायमची ‘पेन्शन’ देऊन घरी बसवण्यासाठी सज्ज राहा, असे आव्हानही त्यांनी यावेळी उपस्थितांना केले.
महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणांना वेग येत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेवगाव आणि उदगीर येथील जाहीर सभांमधून विकासाचा नवा रोडमॅप मांडत जनशक्तीच विजयी होणार असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला. येथे सर्वांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने लाडक्या बहिणींसह लाडक्या भावांचा समावेश आहे.
शेवगावमध्ये शिवशक्ती आणि जनशक्ती एकत्र येणे ही केवळ पक्षांतरणाची घटना नसून विकासाच्या दिशेने घेतलेला निर्णायक टप्पा असल्याचे सांगत शिंदे म्हणाले की, “या लढाईत जनशक्तीच विजय मिळवणार आहे.” विरोधकांना कायमची ‘पेन्शन’ देऊन घरी बसवण्यासाठी सज्ज राहण्याचे आव्हानही त्यांनी कार्यकर्त्यांना दिले.
शेवगावात शिवाजीराव काकडे यांच्या जनशक्ती मंचाचे शिवसेनेत औपचारिक विलिनीकरण जाहीर करत त्यांच्या निर्णयाचे कौतुक करून शिंदे यांनी आगामी शेवगाव नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार माया मुंढे आणि सर्व नगरसेवकांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. तसेच नेवासा येथे महायुती उमेदवार करणसिंह घुले यांनाही विजयी करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
शेतकऱ्यांसाठी ३२ हजार कोटी रुपयांचे पॅकेज, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ४५० कोटी रुपयांची मदत आणि जनतेचे प्रेम हीच खरी राजकीय कमाई असल्याचे सांगत त्यांनी शेवगावासाठी रस्ते, उद्याने, शाळा विकास, अतिक्रमितांचे पुनर्वसन, प्रशासकीय इमारत, MIDC आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची घोषणा केली.
दरम्यान, उदगीरमध्ये झालेल्या सभेत शिंदे यांनी शहराच्या विकासाचा ठाम संकल्प करत स्पष्ट संदेश दिला. “उदगीरमध्ये बदल अटळ आहे आणि हा बदल धनुष्यबाणावर बटण दाबूनच होणार आहे.”
नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुनीता पंचाक्षरी आणि २५ नगरसेवकांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत शिंदे म्हणाले की, उदगीरमध्ये उद्योग, रोजगार आणि नागरी सुविधांचा अभाव असल्याने लोक त्रस्त आहेत. हे शहर बदलणार असून त्याचा मार्ग शिवसेनेचा धनुष्यबाण हाच आहे.
“आठ दिवसांनी मिळणाऱ्या पाण्यासाठी ३,००० रुपये आकारला जाणारा कर हा सरळ जनतेवरील अन्याय असून तो संपवला जाईल,” असे आश्वासन देत त्यांनी उदगीरमधील २०० खाटांचे रुग्णालय तातडीने सुरू करण्याचे आदेश दिले. MIDC प्रक्रिया वेगात राबवून रोजगारनिर्मिती, गोरगरीबांना गायरान जमिनीवर हक्क आणि नवीन जिल्ह्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचेही ते म्हणाले.
‘माझी लाडकी बहिण’ योजनेवर टीका होत असली तरी योजना सुरूच राहील आणि दिलेला शब्द मी पाळला आहे आणि पुढेही पाळणार,” असा भावनिक उल्लेख त्यांनी केला.
दोन्ही सभांत विविध समाज बांधवांना एकत्र येण्याचे आवाहन करत शिंदे म्हणाले,
“मुस्लिम समाज, मराठा समाज, लिंगायत, धनगर आणि ओबीसी सर्व समाज एकत्र आल्यास विकास थांबू शकत नाही. जनशक्ती जिंकणार आहे, धनशक्ती नव्हे.”
मतदान हा भवितव्याचा निर्णय असल्याचा पुनरुच्चार करत त्यांनी शेवटी आवाहन केले की,
“दोन तारखेला धनुष्यबाणासमोरील बटण दाबा आणि विकासाचा मार्ग निवडा. तुमचे एक मत संपूर्ण भागाचा कायापालट करू शकते.”








