
भिवंडीजवळील खारबाव येथे सुरू असलेल्या इमारत बांधकामामध्ये घरे आणि गाळे विकत घेण्यासाठी सुमारे तीन हजार नागरिकांनी संबंधित विकासकाकडे ८० टक्क्यांहून अधिक रक्कम दिली, मात्र गेल्या १५ वर्षांत विकासक घरे देण्यात असमर्थ ठरला असून तब्बल १०० कोटींचा घोटाळा उघडकीस आला आहे. या कुटुंबांनी अखेर आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन व्यथा मांडली.
खोपट येथील भाजप कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात या कुटुंबांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन निवेदन दिले. सन २०११ ते २०१७ या काळात बिल्डर श्री महावीर पटवा आणि कन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत भिवंडीजवळील खारबाव आणि पायेगाव येथे इमारत बांधकाम सुरू होते. कमी दरात घरे आणि दुकानाचे गाळे देण्याचे आमिष विकासकाने दाखवल्याने मध्यमवर्गीय आणि गरजू कुटुंबांनी ८० टक्के रक्कम जमा केली. मात्र त्यांना घरे मिळाली नाहीत. दरम्यान विकासकाने बनावट शासकीय कागदपत्रे करून बांधकाम केल्याचे स्पष्ट झाल्याने २०१५ साली जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या बांधकामावर कारवाई करण्यात आली. आर्थिक गुन्हे शाखेच्या माहितीनुसार या प्रकल्पात सुमारे तीन हजार नागरिकांनी १००कोटींहून अधिक रकमेची फसवणूक झाल्याचे या नागरिकांनी सांगितले. या विकासकावर गुन्हे दाखल करून त्याची मालमत्ता ताब्यात घेण्यात आली असली तरी फसवणूक झालेल्या कुटुंबांना त्यांचे पैसे परत मिळाले नसल्याने ते हवालदिल झाले आहेत.
याबाबत आमदार संजय केळकर म्हणाले, या प्रकरणात फसवणूक झालेल्या तक्रारदारांना अद्याप पब्लिक प्रोसिक्युटर देण्यात आलेला नाही. विकासकाची मालमत्ता विकून त्यातून नागरिकांचे पैसे लवकर मिळावेत यासाठी मी पाठपुरावा करणार आहे. जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत मी त्यांच्या पाठीशी ठाम उभा राहणार असल्याचे श्री.केळकर म्हणाले.
या कार्यक्रमात शिधावाटप कार्यालय, भूमी अभिलेख, महानगर गॅस जोडणी, महात्मा फुले मार्केटमधील गाळे धारकांच्या करपावत्या, प्रोव्हिडन्ट फंड, पाणीटंचाई आदीबाबत निवेदने प्राप्त झाली.
जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात माजी उपमहापौर अशोक भोईर, परिवहन सदस्य विकास पाटील, ठाणे जिल्हा हाउसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, माजी नगरसेवक भरत चव्हाण, महेश कदम, ॲड. अल्केश कदम आदी उपस्थित होते.







