
“
छत्रपती संभाजीनगर, दि. २६ नोव्हेंबर २०२५ : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि शिवसेना आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाने निवडणूक तयारीचा मार्ग स्पष्ट झाला. जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, जिल्हा समन्वयक प्रतिभा जगताप तसेच विविध महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
बैठकीचे प्रास्ताविक प्रतिभा जगताप यांनी केले. त्यानंतर जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी मनोगत मांडले. आमदार प्रदीप जयस्वाल यांनी संभाजीनगरातील कामांची यादी सांगत आगामी निवडणुकीसाठी महिलांनी घराघरात जाऊन सक्रियपणे काम करण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, “या निवडणुकीत ३५ ते ४० हजार मतांचे लक्ष्य गाठायचे आहे. शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे.”
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन — “महिला अग्रस्थानी, तयारी भक्कम!”
त्यानंतर विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उत्स्फूर्त भाषण करत महिलांना निवडणुकीच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या रणनीती, सार्वजनिक जीवनातील वर्तनशैली आणि जनसंपर्क तंत्रज्ञानाचे सखोल मार्गदर्शन केले.
त्या म्हणाल्या, “निवडणूक म्हणजे अचानक येणारी परीक्षा नाही. जसा हुशार विद्यार्थी कोणत्याही वेळी परीक्षा द्यायला तयार असतो तशाच पद्धतीने महिला पदाधिकारी निवडणुकीसाठी सज्ज असाव्यात. सर्वोच्च न्यायालयाने उद्या किंवा महिन्यानंतर निवडणुकीचा निर्णय दिला तरी आपली तयारी पूर्ण असली पाहिजे.”
डॉ. गोऱ्हे यांनी महिलांना हसतमुख राहणे, जनतेत आत्मविश्वास निर्माण करणे, सहकाऱ्यांतील मतभेद टाळणे, प्रत्येक प्रभागात ‘लाडकी बहिण’ लाभार्थ्यांशी दृढ संपर्क निर्माण करणे, तसेच डिजिटल माध्यमातून आपल्या कामाची योग्य नोंद ठेवण्याचे महत्व स्पष्ट केले.
त्या पुढे म्हणाल्या, “महिला कोणत्याही परिस्थितीत कमी बजेटमध्ये मोठे काम करू शकतात. इव्हेंटपेक्षा जनसंपर्क महत्त्वाचा आहे. हॉस्पिटल भेटी, रुग्णांना आधार, समाजातील छोट्या-छोट्या गरजा पूर्ण करणे, हेच खरे जनसेवा काम. लोकांना वाटले पाहिजे की शिवसेना त्यांच्या सुखदुःखात खऱ्या अर्थाने सोबत आहे.”
शिवसेनेचा इतिहास, संभाजीनगर नामांतराचा प्रवास, शिंदे साहेबांचे नेतृत्व आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांची माहिती प्रत्येक पदाधिकाऱ्याने आत्मसात करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“आपल्याला विचारलेला प्रत्येक प्रश्न हा आपल्या नेतृत्वावरील विश्वास टिकवण्यासाठी असतो. म्हणूनच उत्तरे ठोस आणि माहितीपूर्ण असावीत,” असेही डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते महिलांचा पक्षप्रवेश
बैठकीच्या शेवटी स्मिता संतोष कोमुले, स्नेहा गणेश शिंदे, सीमा अशोक कागे, प्रिया विजय बंडी, हौसाबाई अशोक गवळी आणि ज्योती दिलीप नगराळे या महिलांचा शिवसेनेत पक्षप्रवेश शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते संपन्न झाला. या प्रवेशामुळे मध्य भागातील महिला संघटना आणखी मजबूत होईल असा निर्धार करण्यात आला.
बैठकीदरम्यान शिवसेना महिला आघाडीच्या विविध पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. महिला संपर्कप्रमुख सौ.प्रतिभा जगताप जिल्हाप्रमुख शारदाताई घुले (छत्रपती संभाजीनगर), जिल्हाप्रमुख लक्ष्मी नरहिरे (नांदेड), कलाताई ओझा, अंजली मांडवकर, सुषमा यादगिरे, पद्मा शिंदे आणि संगीता बोरसे या महिला पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून बैठक अधिक उत्साहपूर्ण केली.







