
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटिरिअर डिझाइनर्स (IIID) – ठाणे विभागाची २०२५–२०२७ कार्यकाळासाठी नवीन कार्यकारिणी जाहीर
ठाणे – वास्तुरचनेच्या आणि आंतररचनेच्या क्षेत्रात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटिरिअर डिझाइनर्स (IIID), ठाणे विभागाने २०२५–२०२७ या नवीन कार्यकाळासाठीची कार्यकारीणी जाहीर केली आहे. या नवीन कार्यकारीणीच्या अध्यक्षपदी वास्तुरचनाकार मंजुषा श्रेष्ठ यांची निवड करण्यात आली आहे. त्या एल. एस. रहेजा कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या माजी विद्यार्थीनी असून, गेल्या २२ वर्षांपासून वास्तुरचना आणि अंतर्गत सजावट या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत.
त्यांच्या नेतृत्वाखालील या कार्यकारीणीत वास्तुरचनाकार रश्मी तिवारी (माजी अध्यक्षा),वास्तुविशारद संगीता अरोरा (मानद सचिव), वास्तुरचनाकार सदाशिव यादव (मानद कोषाध्यक्ष),निखिल सुळे (उपाध्यक्ष – ट्रेड), वास्तुविशारद सायली चौधरी (मानद संयुक्त सचिव),तसेच वास्तुविशारद केशव चिकोडी (अध्यक्ष – आयआयए कल्याण-डोंबिवली), वास्तुविशारद प्राजक्ता देशमुख, वास्तुरचनाकार निशा वाळके (सहयोगी सदस्य) आणि महेश पेडणेकर (ट्रेड सदस्य) यांचा समावेश आहे.
कार्यकारी समिती सदस्य म्हणून वास्तुरचनाकार हिरालाल विश्वकर्मा, चंद्रकांत हुलावले, आणि वास्तुरचनाकार अलका कुरतडकर यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.
नवीन कार्यकारीणीचा शपथविधी समारंभ शुक्रवार, ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी ठाण्यातील विहंग पाम क्लब येथे उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास वास्तुकलेच्या क्षेत्रातील दिग्गज आणि संस्थेचे वरिष्ठ सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून वास्तुविशारद जिग्नेश मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष – इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटिरिअर डिझाइनर्स तसेच उपाध्यक्ष – आशिया पॅसिफिक स्पेस डिझायनर्स असोसिएशन, हे उपस्थित होते. त्यांच्यासोबत राष्ट्रीय खजिनदार सुनीता वर्गीस आणि राष्ट्रीय कार्यकारीणी सदस्य वास्तुरचनाकार हसमुख शहा यांची विशेष उपस्थिती लाभली.
आपल्या भाषणात जिग्नेश मोदी यांनी ठाणे विभागाच्या कार्याविषयी समाधान व्यक्त केले आणि मागील अध्यक्षांनी संस्थेच्या प्रगतीसाठी केलेल्या योगदानाचा विशेष उल्लेख केला. त्यांनी ठाण्याच्या वेगाने वाढणाऱ्या शहराच्या पार्श्वभूमीवर वास्तुरचनाकारांवर वाढती जबाबदारी असल्याचे सांगत, नवोदित आणि अनुभवी वास्तुरचनाकारांसाठी प्रशिक्षण आणि विकासाचा विशेष अभ्यासक्रम लवकरच सुरू होईल, अशी घोषणाही केली.
या प्रसंगी ठाण्याच्या वास्तुरचना क्षेत्रात गेली ३४ वर्षे सातत्याने कार्यरत असलेल्या साकार आर्किटेक्ट्सचे वास्तुविशारद संदीप प्रभू (अध्यक्ष, महाराष्ट्र प्रांत आयआयए) आणि वास्तुविशारद मकरंद परांगे या द्दोघांच्या विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या दीर्घकालीन योगदानामुळे ठाण्याच्या वास्तुरचना क्षेत्राला नवे परिमाण मिळाले आहे, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
या शपथविधी सोहळ्यास ठाणे विभागातील १०० हून अधिक सदस्य, आयआयए ठाणे अध्यक्ष वास्तुविशारद मकरंद तोरसकर, चिटणीस वास्तुरचनाकार अनिल जगवानी, तसेच वास्तुविशारद सुशील सुळे, शर्मिष्ठा मुखर्जी, ज्येष्ठ वास्तुविशारद प्रवीण जाधव यांच्यासह मुंबई आणि नवी मुंबईतील नामवंत वास्तुविशारद व अंतर्गत सजावट तज्ज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान नवीन कार्यकारीणीच्या योजनांचा आढावा घेण्यात आला. पुढील दोन वर्षांत ठाणे विभागामार्फत स्थानिक वास्तुविशारदांसाठी सेमिनार्स, कार्यशाळा, डिझाईन प्रदर्शनं आणि विद्यार्थी प्रोत्साहन कार्यक्रम आयोजित करण्याची योजना मंजुषा श्रेष्ठ यांनी मांडली.
त्यांनी सांगितले की, “IIID ठाणे विभाग केवळ डिझाईन क्षेत्रापुरते मर्यादित न राहता, सामाजिक जबाबदारी स्वीकारून टिकाऊ, पर्यावरणपूरक आणि मानवी दृष्टिकोनातून संवेदनशील डिझाईन संस्कृती निर्माण करण्याच्या दिशेने कार्यरत राहील.”
या कार्यक्रमाने ठाणे विभागातील वास्तुरचनाकारांमध्ये नवचैतन्य निर्माण केले असून, येणाऱ्या काळात IIID ठाणे विभाग वास्तुरचना क्षेत्रात नवीन दिशा देईल, अशी आशा सर्वांनी व्यक्त केली.










