
कार्तिकी एकादशीच्या महापूजेपूर्वीच विठुरायाने ठाण्यात अवतरून मला दर्शन दिले..
ठाण्यातील उपवन तलावावरील विठ्ठलाच्या 51 फूट भव्य मूर्तीचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते अनावरण
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने चार ठिकाणी उभारल्या जाणार भव्य विठ्ठलमूर्ती
वर्तक नगर येथे उभारणार भव्य वारकरी भवन
ठाणे, ता. 31 : ठाणे येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उपवनघाट येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 51 फूट उंचीच्या भव्य विठ्ठल मूर्तीचे अनावरण संपन्न झाले. या वेळी भक्तांची मांदियाळी उसळली होती. मंत्री प्रताप सरनाईक, अन्य मान्यवर व जनतेच्या साक्षीने हा ऐतिहासिक आणि भक्तिमय सोहळा पार पडला. यानिमित्ताने कार्तिकी एकादशीच्या महापूजेला जाण्यापूर्वीच विठुरायाने ठाण्यात अवतरून मला दर्शन दिले असल्याची भावना शिंदे यांनी व्यक्त केली.
यावेळी खासदार नरेश म्हस्के, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी नगरसेवक आणि युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, माजी नगरसेविका परिषा सरनाईक, विहंग सरनाईक, मूर्तीकार सतीश घारगे, सत्यजीत लांडगे, संदीप नाटे आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्घाटन कार्यक्रमात बोलताना शिंदे म्हणाले, “आजचा दिवस ठाणेकरांसाठी पवित्र आहे. कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरात आपण भगवान पांडुरंगाची सेवा करतो, पण आज तुमच्या सर्वांच्या रूपाने पांडुरंग येथे उपस्थित आहे.”
ते पुढे म्हणाले, “पांडुरंगाची 51 फूट उंच अशा भव्य मूर्तीची स्थापना ठाण्यात झाली आहे. हे कार्य प्रताप सरनाईक आणि त्यांच्या टीममुळे शक्य झाले. ठाणेकर भाग्यवान आहेत.”
शिंदे यांनी आपल्या कार्यकाळाची आठवण करून देत सांगितले, “मी मुख्यमंत्री असताना अनेक लोकाभिमुख योजना राबवल्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना बंद होणार नाही. गोमातेला राज्य मातेचा दर्जा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. शंकराचार्यांनी मला ‘काऊ मॅन’ ही पदवी दिली आणि ते माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.”
ते भावनिक होत म्हणाले, “मी वारकरी आणि शेतकरी कुटुंबातून आलेलो आहे. लहानपणी आजी-आजोबा, आई-वडिलांसोबत पंढरपूरला जात होतो. आज उपमुख्यमंत्री म्हणून नाही, तर विठ्ठल भक्त म्हणून येथे आलो आहे.”
शिंदे म्हणाले, “वारकरी दिंड्यांना अनुदान, विमा आणि वाहन टोलमुक्ती हे महायुती सरकारनेच केले. पंढरपूरमध्ये स्वच्छता, पाणी, मोबाईल सुविधा, शौचालये उपलब्ध केली आहेत.”
“अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने सरकार मदत करेलच. पण ज्यांच्या घरी लग्न ठरले आहे ते लग्न मोडणार नाही; सर्व खर्च शिवसेना करेल,” असे शिंदे म्हणाले. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्याचा निर्णय देखील महायुती सरकारने घेतल्याचे त्यांनी सांगितले.
प्रताप सरनाईक यांनी पूरग्रस्त भागात 101 गायी दान केल्याचे सांगत त्यांच्या कार्याचे कौतुकही त्यांनी केले.
“इंदुरीकर महाराज साध्या, सोप्या भाषेत समाजाला दिशा देतात. हरिनाम सप्ताहात सहभागी झाल्याने वाईट विचार जातात,” अशी शिकवण आम्हाला आनंद दिघे यांनी दिली,असे शिंदे म्हणाले.
“ठाणे बदलत आहे. हा घाट अहिल्यादेवींच्या नावाने उभारला आहे. मिरा-भाईंदर येथे २ आणि कासार वडवली येथे १ अशा चार ठिकाणी अशा विठ्ठल मूर्ती उभारल्या जातील,” असे ते म्हणाले.
शेवटी ते म्हणाले, “मी चीफ मिनिस्टर नाही, कॉमन मॅन आहे. तुमच्या आशीर्वादाने शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री हा प्रवास शक्य झाला. वारकरी संप्रदाय जिथे बोलावतो तिथे धावून येतो.” असे आवर्जून सांगितले.









