
जागतिक विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकास २५ लाखांचे पारितोषिक
‘संस्कृतीची दहीहंडी, विश्वविक्रमी दहीहंडी’, रंगणार मानवी मनोऱ्यांचा थरार
‘शोले’ चित्रपटाचे सुवर्ण वर्षे साजरा करणार
ठाणे, : दरवर्षी प्रमाणे यावर्षीही ‘संस्कृतीची दहीहंडी महोत्सव’ उत्साहात, जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे. यंदा पहिले नऊ थर लावणाऱ्या गोविंदा पथकास ११ लाखांचे बक्षीस तसेच आकर्षक सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. दि. १६ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० ते रात्रौ १० पर्यंत वर्तकनगर येथील ठाणे महानगरपालिका क्र. ४४ च्या पटांगणात संस्कृती दहीहंडी महोत्सव होणार आहे. या दहीहंडीसाठी कलाकार आणि राजकीय नेते देखील उपस्थित असणार आहे.
दहीहंडी उत्सवाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यातील वर्तक नगर येथील संस्कृतीची विश्वविक्रमी दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. पहिले ९ थर रचल्याच्या नंतर या दहीहंडी उत्सवात ९ थर लावणाऱ्या गोविंदा पथकास ५ लाख व आकर्षक ट्रॉफी, ८ थर लावणाऱ्या गोविंदा पथकास २५ हजार व आकर्षक ट्रॉफी, ७ थर लावणाऱ्या गोविंदा पथकास १५ हजार व सन्मानचिन्ह, ६ थर लावणाऱ्या गोविंदा पथकास १० हजार व सन्मानचिन्ह, ५ थर लावणाऱ्या गोविंदा पथकास ५ हजार व सन्मानचिन्ह तसेच मुंबई, ठाणे येथील महिलांचे गोविंदा पथकाला सुद्धा विशेष मान देण्यात येणार असून त्यांच्यासाठीही विशेष पारितोषिक ठेवले आहे. यंदा बॉलिवूडच्या शोले चित्रपटास ५० वर्षे पूर्ण झाली, या निमित संस्कृती दहीहंडी उत्सव ‘शोले’ चित्रपटाचा ‘सुवर्ण महोत्सव’ साजरा करणार आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे यावर्षी जागतिक विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकास २५ लाखाचे बक्षीस जाहीर केले आहे.
शिवसेना प्रमुख हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे आणि गुरुवर्य स्व. आनंद दिघे साहेबांनी दहीहंडी उत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यास सुरुवात केली. त्यांची परंपरा शिवसेनेचे मुख्य नेते मा. एकनाथजी शिंदे साहेब आणि आम्ही शिवसैनिक पुढे नेत आहोत. यंदा प्रो गोविंदा सीझन ३ देखील मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला. गोविंदा हा खेळ मातीपासून ते मॅटपर्यंत पोहचला आणि अपघाताचे सत्र थांबले जावे हा प्रो गोविंदामागील उद्देश आहे. राज्य शासनाने आपल्या गोविंदाला क्रीडा प्रकाराचा दर्जा दिला आहे. मला अभिमान आहे आपल्या दहीहंडी उत्सव हा दिवसेंदिवस ग्लोबत होत आहे, असे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
दहीहंडीची थीम शोले चित्रपटाची ठेवण्यात आली आहे. चित्रपटाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त या माध्यमातून चित्रपटाच्या कलाकारांना ट्रिब्यूट दिले जाईल.
गोविंदांच्या काळजी पोटी शासनातर्फे दीड लाख गोविंदांचा मोफत विमा काढण्यात येत आहे. यंदाचा गोविंदा अपघात मुक्त व्हावा यासाठी प्रयत्न करूया, असे आवाहन आमदार प्रताप सरनाईक यांनी केले.
युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक म्हणाले, १११ स्पॅनिश खेळाडू (castellers) या दहीहंडी उत्सवात सहभागी होणार आहेत आणि ह्युमन पिरॅमिड सादर करतील. आपल्या संस्कृतीचे आदान प्रदान होईल.
यावेळी बार्सिलोनाच्या विला फ्रांका येथील विश्व विक्रम विजेत्या मानवी मनोरा संघाचे प्रतिनिधी टोनी, ऍना तसेच महाराष्ट्र गोविंदा असोसिएशनचे बाळा पडेलकर, गीता झगडे, अभिषेक सुर्वे, शिवसेना विभाग प्रमुख रवी घरत व इतर मान्यवर उपस्थित होते.