
ठाणे, ता, 7 :
“ठाणे बोरवली दुहेरी बोगदा प्रकल्पात अनेक अडथळे आणि स्पीडब्रेकर्स आले, पण आम्ही ते सर्व दूर केले. विकासाच्या वाटेवरील खलनायक हटवून आता ‘नायक’ पुढे आणला आहे,” असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
ठाणे जिल्ह्यातील ठाणे बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या देखील उपस्थित होत्या.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ‘नायक’ आणि ‘अर्जुन’ या टनेल बोरिंग मशीनच्या नावामागील संकल्पना स्पष्ट करत संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथील जैवविविधतेशी त्याचा संबंध जोडला. “महायुतीची ताकद आणि नायकाची गती यामुळे हा प्रकल्प वेळेत पूर्ण होणार,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
हा प्रकल्प एकूण 11.84 किमी लांबीचा असून त्यापैकी 10.25 किमी बोगदा पूर्णपणे भूमिगत असणार आहे. दुहेरी बोगद्यात प्रत्येकी तीन लेन असतील, ज्यामध्ये दोन वाहतुकीसाठी आणि एक आपत्कालीन मार्गिका असेल. प्रत्येक 300 मीटरवर क्रॉस पॅसेज तयार करण्यात येणार असून बोरिवलीकडून 5.75 किमी आणि ठाण्याकडून 6.9 किमी असे टनेल बोरिंग मशीनद्वारे उत्खनन होणार आहे. या प्रकल्पाचा खर्च सुमारे 16,600 कोटी रुपये असून अंमलबजावणी एमएमआरडीएच्या माध्यमातून केली जात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
सध्या ठाणे ते बोरिवली प्रवासासाठी 60 ते 120 मिनिटांचा कालावधी लागतो. मात्र हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हा प्रवास केवळ 15 मिनिटांत पूर्ण होणार असून अंतर 23 किमीवरून 12 किमीपर्यंत कमी होईल. त्यामुळे इंधनाची बचत होऊन प्रदूषणात मोठी घट होणार आहे आणि घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल, असे शिंदे म्हणाले.
पर्यावरणाचा विचार करत हा बोगदा पूर्णपणे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान खाली बांधण्यात येत आहे. जैवविविधतेला कुठलाही धोका होणार नाही यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या असून 11,000 वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे. कमी व्हायब्रेशन तंत्रज्ञानाचा वापर करून काम केले जाणार आहे. स्थानिक रहिवाशांच्या चिंता दूर करण्यासाठी बैठका घेण्यात आल्या असून धूळ टाळण्यासाठी dedicated debris corridor, डंप ट्रकसाठी स्वतंत्र मार्ग आणि 7 मीटर रुंद सेवा रस्ते तयार करण्यात येणार आहेत.
या प्रकल्पात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात असून Single-shield, open-type TBM वापरण्यात येणार आहे. 13.34 मीटर व्यासाचे हे TBM भारतातील सर्वात मोठ्यांपैकी एक असून पुढील, मध्य आणि मागील शील्ड्सच्या साहाय्याने उत्खननादरम्यान स्थिरता राखली जाणार आहे.
कन्व्हेयर बेल्टची लांबी 350 मीटरवरून 100 मीटरपर्यंत कमी करण्यात आली असून कमी आवाज आणि कमी कंपन या तंत्रज्ञानामुळे नागरिकांना त्रास होणार नाही. विशेष म्हणजे या कामावर प्रशासनासह आमची देखील सतत नजर राहणार असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
या प्रकल्पामुळे नवी मुंबई, कल्याण आणि नाशिककडून येणारी वाहने ठाणे शहराला बायपास करून थेट पुढे जाऊ शकतील. तसेच दहिसर, अंधेरी आणि बोरिवली पश्चिम या भागांशी थेट जोडणी होणार असून भविष्यात पोस्टल रोड आणि कोस्टल रोडशीही या प्रकल्पाचे एकत्रीकरण करण्यात येणार आहे.
या प्रकल्पाचा प्रवास पाहिला असता सुरुवातीला तो MSRDC कडे होता, मात्र नंतर निर्णय घेऊन तो MMRDA कडे वर्ग करण्यात आला. 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन झाल्यानंतर आता प्रत्यक्ष कामाला वेग देण्यात आला आहे.
हा प्रकल्प देशातील सर्वात खोल आणि मोठ्या शहरी बोगद्यांपैकी एक ठरणार असून “इंजिनिअरिंग मार्वल” म्हणून ओळखला जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “हा फक्त बोगदा नाही, तर मुंबई आणि एमएमआरच्या विकासाचा नवा अध्याय आहे. लाखो लोकांना याचा फायदा होईल. वेळ, इंधन आणि पर्यावरण – तिन्ही बाबतीत हा प्रकल्प वरदान ठरेल.”
हा प्रकल्प मे 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून लाखो नागरिकांना दिलासा मिळणार आहे. वाहतूक, प्रदूषण आणि वेळ या तिन्ही बाबींवर मोठा सकारात्मक परिणाम करणारा ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प महाराष्ट्राच्या विकासाचा खऱ्या अर्थाने “नायक” ठरणार आहे.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे, ठाण्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, ठाणे मनपाच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमोद हिंदुराव, नजीब मुल्ला आणि महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच एमएमआरडीएचे सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
….










