
ठाणे,ता. २६ (प्रतिनिधी)
श्री अंबे मातेचा जयघोष आणि महाआरती करून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुविद्य पत्नी सौ. लता एकनाथ शिंदे यांच्याकडुन कोपरीतील चैत्र नवरात्र उत्सवात हजारो भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. दरम्यान, गुरुवारी सायंकाळी साग्रसंगीत सांजआरती करून रात्रौ देवीच्या दरबारात बलिदान आणि पुर्णाहुती अधिष्ठान करण्यात आले.
ठाणे पुर्व, कोपरी, येथील संत तुकाराम महाराज मैदानात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने दरवर्षी धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्यावतीने श्री अंबे मॉ चैत्र नवरात्रौत्सव साजरा केला जातो. यंदा चैत्र नवरात्रौत्सवात आकर्षक सजावटीसह काल्पनिक मंदिराचा देखावा साकारण्यात आला होता. नऊ दिवस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तसेच, त्यांच्या कुटुंबियांनी श्री अंबे मातेची प्राणप्रतिष्ठा, नवकुंडात्मक सहस्त्रचंडी याग व महाआरती करून नवमीच्या दिवशी हजारो भक्तांना महाप्रसादाचे वाटप केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी सौ.लता एकनाथ शिंदे यांनी महाभंडाऱ्याच्या अलोट गर्दीत भाविकांना महाप्रसादाचे वाटप करून दरवर्षीचा शिरस्ता पाळला.











