
ठाणे,
संत परंपरेचा गाभा जपत आधुनिक सादरीकरणाच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत संतांचे विचार पोहोचवण्याचा अभिनव प्रयत्न सफल ठरला आहे. धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीने ठाण्यात आयोजित चैत्र नवरात्रोत्सवात सोमवारी सायंकाळी सादर झालेल्या ‘अभंग रिपोस्ट’ या विशेष सांगितिक कार्यक्रमाने उपस्थित रसिकांची अक्षरशः ब्रह्मानंदी टाळी लागली.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून ठाणे पूर्वेतील कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानात चैत्र नवरात्रोत्सवानिमित्त सहस्त्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञ सुरू आहे. या महायज्ञाच्या पाचव्या दिवशी ‘अभंग रिपोस्ट’ कार्यक्रमात भाविक तल्लीन झाले. या प्रसंगी सौ. लता एकनाथ शिंदे, महापौर शर्मिला पिंपळोलकर, ज्येष्ठ अभिनेत्री निर्मिती सावंत, अभिनेते मंगेश देसाई, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, शिवसेना सचिव संजय मोरे, जयप्रकाश कोटवानी, प्रमोद बनसोडे तसेच शिवसेना पदाधिकारी, नगरसेवक आणि मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
संतवाङ्मयाचा आधुनिक अविष्कार ठरलेल्या ‘अभंग रिपोस्ट’ या सांगितिक कार्यक्रमातून संतांची शिकवण आजच्या युवा जनरेशनपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. संत निवृत्ती, ज्ञानदेव, तुकाराम, एकनाथ आदी संतांच्या अभंगांतील ‘विठ्ठल विठ्ठल’ च्या नामस्मरणासह गजर करण्यात आला. “देह देवाचे मंदिर”, “लहानपण देगा देवा”, “आनंदाचे डोही आनंद तरंग” यांसारख्या लोकप्रिय अभंगांना आधुनिक फ्यूजनची जोड देत भक्ती आणि सामाजिक संदेश यांचा संगम साधण्यात आला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या “मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव” या अभंगातून दिखाऊ भक्तीवर प्रहार करण्यात आला. तसेच “चल गं सखे, चल गं सखे…पंढरीला” या अभंगातून वारकरी परंपरेचा उत्साहाचे जिवंत सादरीकरण करण्यात आले. मला दादला नको गं बाई… या भारूडाच्या माध्यमातून “फाटक्या कपड्यांची फॅशन करण्यापेक्षा चांगल्या विचारांची फॅशन करा” आदी विविध सामाजिक संदेश देण्यात आले. “आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडाना” या फ्यूजनमधून तरुणांना सकारात्मक जीवन मूल्यांची जाणीव करून देण्यात आली. आजची तरूण पिढी विठ्ठलभक्तीपासून दूर जाऊ नये, म्हणून संतांच्या अभंगांचे विडंबन न करता त्यांना आधुनिकतेची जोड देत नव्या पद्धतीने सादर करून भक्तीचा नवा मार्ग या कार्यक्रमातून दाखवण्यात आला. पारंपरिक भक्ती आणि आधुनिक सादरीकरण यांचा संगम साधत ‘अभंग रिपोस्ट’ने तरुणाईमध्ये केवळ भक्तीची नवचेतना निर्माण केली नाही तर मंडपात फेर धरून तल्लीन व्हावयास लावले.
दरम्यान, धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानतर्फे आयोजित या चैत्र नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून संतांची महती आणि त्यांचे विचार ‘रिपोस्ट’ करून समाजात एक प्रकारे जनजागृती करण्याचा आयोजकांचा संकल्प यानिमित्ताने यशस्वीरीत्या पूर्ण होत असल्याचे दिसून आले.










