
ठाणे: ठाणे शहराची वाढती लोकसंख्या आणि वाहनांचा विचार करता घोडबंदरपासून वर्तकनगर आणि स्टेशन परिसरात होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिका, वाहतूक शाखा आणि आरटीओच्या समन्वयातून काही निर्णय घेण्यात आले असून आवश्यक वाहतूक बदलांसाठी लवकरच प्रायोगिक तत्वावर अधिसूचना काढण्यात येणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली.
शहरातील वाढत्या वाहतूक समस्या आणि नियमित होणारी वाहतूक कोंडी यावर उपाययोजना करण्यासाठी आमदार संजय केळकर यांनी तीन हात नाका येथील वाहतूक शाखेच्या कार्यालयात वाहतूक शाखा, महापालिका, आरटीओ आणि नागरिकांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक घेतली. यावेळी झालेल्या निर्णयांची माहिती श्री. केळकर यांनी समाजमाध्यमांना दिली.
शहरातील घोडबंदर, स्टेशन परिसर, वर्तकनगर, मध्यवर्ती ठाणे आदी विभागात वाढती लोकसंख्या आणि वाहने यामुळे नियमित वाहतूक कोंडीला नागरिकांना सामोरे जावे लागते. अवजड वाहने, खासगी बसगाड्या, मीटर आणि शेअर रिक्षा यांची अनधिकृतपणे होणारी वाहतूक, बेकायदेशीर पार्किंग फेरीवाल्यांचे अतिक्रमण यामुळे शहरात विशेषतः घोडबंदर आणि स्टेशन परिसरात वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
वाहतूक नियंत्रण परिपूर्ण व्हावे यासाठी शहरात दोन हजार सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मात्र वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यासाठी वाहतूक शाखेचे मनुष्यबळ कमी पडत असेल तर पुढील अधिवेशनात त्याबाबत मागणी करण्यात येईल, असे, श्री.केळकर यांनी सांगितले.
यावेळी वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज शिरसाठ, आरटीओचे अधिकारी श्री.गोसावी, नौपाडा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त महेश पाटील, सहाय्यक आयुक्त श्रीमती भोईर, श्री. ढोले तसेच नागरिकांच्या वतीने माजी उपमहापौर ॲड. सुभाष काळे, नगरसेवक सीताराम राणे, विकास पाटील, अमित सरय्या, सुनेश जोशी, उषा वाघ, व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी मितेश शहा, जितेंद्र मढवी, हिरानंदानी भागातील प्रतिनिधी श्री. डे, मेघनाथ घरत, विशाल वाघ, निलेश पाटील, सुरज दळवी, ॲड. अल्केश कदम, फरहान सिद्धीकी आदी उपस्थित होते.
चौकट
वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतुकीत काही बदल करण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर अधिसूचना काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्टेशन परिसरात वाहतुक शाखेच्या अधिकाऱ्यांबरोबरच आरटीओचे अधिकारी देखील उपस्थित असावेत, अशा सूचना केल्या असून नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी देखील वाहतूक कोंडी होणार नाही याकडे लक्ष देण्याची गरज आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केली.











