
ठाणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटन अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने सेंट लॉरेन्स स्कूल, ठाणे येथे शिवसेनेची अत्यंत महत्त्वपूर्ण व निर्णायक आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार घेण्यात आली. तसेच माजी आमदार व शिवसेना उपनेते रविंद्र फाटक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक १८ मधील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसैनिकांची सविस्तर आढावा बैठक पार पडली.
या बैठकीत ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रभागातील संघटनात्मक मजबुती, बूथनिहाय तयारी, मतदारांपर्यंत पोहोचण्याची रणनिती, स्थानिक प्रश्न, नागरिकांच्या अपेक्षा तसेच महायुती सरकारच्या माध्यमातून झालेली विकासकामे प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना अधिक जोमाने व ताकदीने उतरावी, यासाठी प्रत्येक पदाधिकारी व शिवसैनिकाने आपली जबाबदारी ओळखून काम करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या महत्त्वपूर्ण बैठकीला शिवसेनेचे सचिव संजय मोरे, सचिव राम रेपाळे, माजी नगरसेविका जयश्री फाटक माजी नगरसेवक दीपक वेतकर, माजी नगरसेविका सुखदा मोरे, माजी नगरसेवक विजय पडवळ उपशहर संघटक अभिजीत पांचाळ, विभाग प्रमुख संजय भोसले महिला विभाग संघटक सीमा आवटी, यांच्यासह लोकप्रतिनिधी, माजी नगरसेवक, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, गटप्रमुख, महिला आघाडीच्या पदाधिकारी, युवासेना पदाधिकारी, शिवसैनिक तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीदरम्यान उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आपापल्या विभागातील परिस्थिती, समस्या आणि निवडणूक तयारीबाबत माहिती मांडली. नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन त्यांची सोडवणूक करणे, विकासकामांचा वेग वाढवणे आणि शिवसेनेची विचारधारा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवणे, यावर विशेष भर देण्यात आला. या आढावा बैठकीमुळे प्रभाग क्रमांक १८ मधील शिवसेना संघटन अधिक बळकट होईल आणि आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना अधिक सक्षमपणे सामोरी जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.








