
ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांना प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील अटल गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कारामुळे ठाणे शहरात उत्साहाचे वातावरण आहे.
अटल फाऊंडेशन, दिल्ली यांच्यामार्फत दरवर्षी विविध क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या व्यक्तींना आंतरराष्ट्रीय अटल ॲवॉर्ड तसेच अटल श्री ॲवॉर्ड आणि अटल गौरव ॲवॉर्ड प्रदान करून सन्मानित करण्यात येते. यंदा ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांना हा सन्मान देण्यात येणार असल्याचे अटल फाउंडेशनच्या राष्ट्रीय अध्यक्षा अपर्णा सिंह यांनी कळविले आहे.
आमदार संजय केळकर हे चतुरस्त्र व्यक्तिमत्व असून ते राजकारणात स्वच्छ प्रतिमेचे, सुशिक्षित, सुसंकृत आमदार म्हणून गेली अनेक वर्षे काम करत आहेत. बेघर आणि अनाथ मुलांचे पुनर्वसन करून त्यांना राष्ट्रीय प्रवाहात आणण्याचे राष्ट्रीय कार्य ते करत आहेत. त्याचबरोबर गरीब आणि गरजूंना अन्नदान, गड किल्ले संवर्धन, कामगार, क्रीडा, कला आदी क्षेत्रात भरीव कार्य करत आहेत. जनसेवकाचा जनसंवाद या उपक्रमातून हजारो नागरिकांच्या समस्या सोडवत आहेत. या चौफेर कार्याची दखल घेऊन त्यांना प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय अटल गौरव पुरस्कार देण्यात येणार असल्याचे अटल फाउंडेशनच्या वतीने कळविण्यात आले आहे.
पुरस्कार सोहळा २४ डिसेंबर २०२५ रोजी प्रधानमंत्री संग्रहालय, तीन मूर्ती मार्ग, नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला असून मान्यवरांच्या उपस्थित श्री. केळकर यांना अटल गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.









