
सोलापूर, ता. ४ : दुष्काळग्रस्त भागातील प्रत्येक गावापर्यंत उजनी धरणाचे पाणी पोहोचवले जाईल तसेच वीजपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यात येईल, असे ठाम आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. कोणत्याही प्रकारची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत, आम्ही कोणाच्या नादाला लागत नाही आणि आमच्या नादाला कोणी लागू नये. कायदा-सुव्यवस्था राखणे हे सर्वांचे कर्तव्य आहे, असे स्पष्ट शब्दांत त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर विराट सभा सोलापूर जिल्ह्यातील वळसंग येथील शंकरलिंग देवस्थान मैदानावर पार पडली. या सभेत मार्गदर्शन करताना त्यांनी विकास, शेतकरी, महिला, युवक, आरोग्य, पायाभूत सुविधा आणि कायदा-सुव्यवस्था या सर्व मुद्द्यांवर सविस्तर भूमिका मांडली.
सभेच्या सुरुवातीला त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, आई तुळजाभवानी, पंढरपूरच्या पांडुरंग, ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज, अक्कलकोटचे स्वामी समर्थ आणि सोलापूरच्या स्वाभिमानी मातीला साष्टांग दंडवत घालून अभिवादन केले. जमलेल्या लाडक्या बहिणी आणि भावंडांना संबोधित करताना त्यांनी राज्यात नुकत्याच घडलेल्या दुर्घटनेचा उल्लेख करून दिवंगत अजित दादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

ही निवडणूक कार्यकर्त्यांची असल्याचे सांगत शिंदे म्हणाले, लोकसभा आणि विधानसभेतील उमेदवार हे कार्यकर्त्यांतूनच घडतात. आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री घडवणारे हेच कार्यकर्ते आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतही तितक्याच मनापासून काम करणे आवश्यक आहे. शिवसेना हा कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारा पक्ष असून येथे कोणी मालक-नोकर नाही, सर्वजण कार्यकर्तेच आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
लाडक्या बहिणींची भूमिका निर्णायक असल्याचे सांगत त्यांनी अनुभव सांगितला की, जिथे महिलांची उपस्थिती मोठी असते तिथे उमेदवार विजयी होतात. मुख्यमंत्री असताना घेतलेल्या निर्णयांचा आढावा देताना त्यांनी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना”, “लेक लाडकी लखपती योजना”, एसटी प्रवासात ५० टक्के सवलत, मुलींच्या उच्च शिक्षणासाठी मोफत सुविधा, महिला बचत गटांना बळकटी, आईचे नाव नावापुढे लावण्याचा निर्णय आणि ७/१२ उताऱ्यावर महिलांचे नाव नोंदवण्याचा निर्णय यांचा उल्लेख केला.
लाडकी बहिण योजनेसाठी वर्षाला सुमारे ४५ हजार कोटी रुपयांचा खर्च होत असून, अफवा कितीही पसरवल्या तरी ही योजना कधीही बंद होणार नाही, असा ठाम शब्द त्यांनी दिला. योग्य वेळी महिलांसाठी आर्थिक लाभ वाढवण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
शेतकरी सन्मान योजना, पीक विमा योजना, एनडीआरएफचे निकष बाजूला ठेवून नुकसानभरपाई, दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टरपर्यंत मदत, ऑक्टोबरमधील नुकसानीसाठीही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिल्याचा त्यांनी उल्लेख केला. ३२ हजार कोटींचे पॅकेज दिल्याचे सांगत शेतकरी हा राज्याच्या तिजोरीवरील पहिला हक्कदार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
दुष्काळी भागातील गावांना उजनी धरणाचे पाणी पोहोचवण्याचे आश्वासन देतानाच, दिवसा वीजपुरवठा सुनिश्चित करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काही ठिकाणी अडचणी असतील तर त्या सोडवण्यात येतील, असेही ते म्हणाले.
शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीबाबत कमिटी गठीत झाल्याचे सांगून, योग्य वेळी कर्जमाफी झाल्याशिवाय राहणार नाही, असा शब्द त्यांनी दिला. वचननाम्यातील प्रत्येक आश्वासन पूर्ण करण्याची जबाबदारी आमचीच आहे, असे त्यांनी ठासून सांगितले.
अक्कलकोट परिसरात एमआयडीसी उभारण्याची गरज अधोरेखित करत त्यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांना सर्वेक्षण सुरू करण्याचे निर्देश देणार असल्याचे सांगितले. यामुळे स्थानिक तरुणांना इथेच रोजगार मिळेल, मुंबई-पुण्याला स्थलांतर करावे लागणार नाही, असे ते म्हणाले. स्थानिक भूमिपुत्रांना न्याय आणि रोजीरोटी मिळाली पाहिजे, हीच आमची भूमिका असल्याचे त्यांनी नमूद केले.
अक्कलकोट तालुक्यातील सोलर प्रकल्पातून शेतकऱ्यांना एकरी ३५ हजार रुपये मिळत असल्याचा उल्लेख करून, हा मोबदला ५० हजार रुपये प्रति एकर मिळाला पाहिजे, असा सरकारचा निर्णय असल्याचे त्यांनी सांगितले आणि तो अंमलात आणण्याचे आश्वासन दिले.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून साडेचारशे कोटी रुपये देऊन सुमारे ७० हजार लोकांचे प्राण वाचवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. “शासन आपल्या दारी” उपक्रमातून पाच कोटी लोकांना लाभ झाला असून, “आरोग्य आपल्या दारी” उपक्रमामुळे मातृ-आरोग्य तपासण्या, आजारांचे वेळेवर निदान आणि उपचार शक्य झाले, असे त्यांनी स्पष्ट केले. महात्मा ज्योतिबा फुले विमा योजनेची रक्कम दीड लाखांवरून पाच लाखांपर्यंत वाढवल्याचा उल्लेखही त्यांनी केला.
कोल्हापूरमधील एका मुलीच्या उपचारासाठी सहाय्यता निधीतून तीन लाख रुपये देऊन तिचा जीव वाचवण्यात आल्याची भावनिक आठवण त्यांनी सभेत सांगितली.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थयात्रा योजना प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश दिल्याचे त्यांनी सांगितले. ज्येष्ठांना सुलभ आणि सन्मानाने तीर्थदर्शन करता यावे, ही सरकारची भूमिका असल्याचे त्यांनी नमूद केले.
हरणा नदीवरील पुलाचा प्रश्न सोडवण्यात आल्याचा, तसेच पितापूर ते ओरई आणि पितापूर ते दर्शन मार्गावरील रस्त्यांच्या दुरुस्तीचे आदेश दिल्याचा त्यांनी उल्लेख केला. वैराग येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी २.५ कोटी रुपयांचा निधी तात्काळ मंजूर केल्याचे उदाहरण देत, “काम करायचे असेल तर जाग्यावर निर्णय घेतो,” असे त्यांनी सांगितले.

कोणत्याही प्रकारची दादागिरी चालणार नाही, असे ठाम सांगत शिंदे म्हणाले, आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत, कायदा-सुव्यवस्था राखणे सर्वांचे कर्तव्य आहे. निवडणूक शांततेत पार पडावी, असे त्यांनी आवाहन केले.
सभेत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवारांची नावे जाहीर करून, धनुष्यबाण चिन्हासमोरील बटण दाबून शिवसेनेच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. अक्कलकोट आणि सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असा शब्द देत त्यांनी दिला.
“ही निवडणूक केवळ मतदानापुरती नाही, तर आपल्या मुलाबाळांच्या भवितव्याचा फैसला करणारी आहे. विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही पुढे चाललो आहोत,” असे सांगत शिंदे यांनी शेवटी “जय हिंद, जय महाराज” या घोषणेसह उपस्थितांचे आभार मानले.
….









