.

उल्हासनगर, ता. 21 : राज्यातील नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांच्या निकालांतून शिवसेना व महायुतीने दणदणीत विजय मिळवला असून, लोकसभा विधानसभेनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांवरही भगवा फडकला आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. उल्हासनगर येथे झालेल्या पक्ष पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते.
मतदारांना आवाहन करताना सांगितले की, १५ तारखेला मतदान करताना धनुष्यबाण व मित्रपक्षांच्या चिन्हासमोरील बटण दाबून महायुतीला विजयी करा. उल्हासनगरमधील निवडणूक एकतर्फी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
शिंदे म्हणाले की, “शिवसेना ही केवळ ठाणे–मुंबईपुरती मर्यादित नाही; चांदा ते बांधापर्यंत शिवसेना पोहोचली आहे.” यंदाच्या निवडणुकांत राज्यभरातून ६५ ते ७० नगराध्यक्ष शिवसेनेचे निवडून येणे ही ऐतिहासिक बाब असून, हजारो नगरसेवक निवडून आले आहेत. हा विजय पूर्णतः कार्यकर्त्यांचा, लाडक्या बहिणींचा व लाडक्या भावांचा असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
शिवसेनेचा मूलमंत्र सांगताना ते म्हणाले, “सत्ता मिळवण्यापेक्षा जनतेची सेवा महत्त्वाची आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलेले ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण नव्हे, तर शिवसेना १०० टक्के समाजकारण करते.” आपत्ती, पूर, कोविडसारख्या संकटांत शिवसैनिक सर्वात आधी धावून जातो, हेच शिवसेनेचे बाळकडू असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
महायुतीबाबत बोलताना शिंदे म्हणाले की, काही ठिकाणी युती म्हणून, तर काही ठिकाणी स्वतंत्र लढत देण्यात आली; मात्र अंतिम निकालात महायुतीचाच विजय स्पष्ट झाला आहे. “नकली–असली शिवसेना कोणती, हे जनतेने निकालातून दाखवून दिले,” असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.
उल्हासनगरमधील विकास कामांचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, ड्रेनेज व पाणीपुरवठ्यासाठी ५४३ कोटी, मूलभूत सुविधांसाठी २४२ कोटी, चार्जिंग सेंटर्स, दिव्यांग प्रशिक्षण केंद्रांसह कोट्यवधींची विकासकामे झाली आहेत. शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न गंभीर असून दर पावसाळ्यात काही लोकांचे जीव जातात, हे चित्र बदलण्यासाठी नगरविकास विभागाच्या माध्यमातून मिनी क्लस्टरचा माध्यमातून पुनर्विकास करण्याचा प्रयत्न आहे.
“आपला अजेंडा विकासाचा आहे. सर्वसामान्यांचा उत्कर्ष हेच शिवसेनेचे ध्येय आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या आहेत. त्यामुळे मंत्री, खासदार, आमदारांनी कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचे आवाहनही त्यांनी केले. “उमेदवारी मिळाली नाही म्हणून रागावू नका; तालुका ते राज्यपातळीवरील पदांमध्ये कार्यकर्त्यांना सामावून घेतले जाईल,” असा दिलासाही त्यांनी दिला.
महाविकास आघाडीवर टीका करताना शिंदे म्हणाले की, “नगरपालिका निवडणुकांत महाविकास आघाडी औषधालाही दिसली नाही. कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडल्याने जनतेने त्यांना घरी बसवले.”त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीत भाजप आरपीआयसहित सर्वजण महायुती म्हणून एकत्र आल्यास महाविकास आघाडीला भोपळा फोडणे देखील अशक्य होईल असे सांगितले.
यावेळी कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख अरुण आशान आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
…..









