
जुन्नर,
“शिवनेरी ही शिवजन्मभूमी असून या पवित्र भूमीत भगवा फडकवणे ही आपली ऐतिहासिक जबाबदारी आहे. विकास, सुविधा, स्त्री सक्षमीकरण आणि जनतेच्या मूलभूत प्रश्नांची सोडवणूक हेच आमचे प्राधान्य आहे,” असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
जुन्नर नगर परिषदेतील शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुजाता काजळे आणि अन्य उमेदवारांच्या प्रचारार्थ जुन्नर येथील धान्य बाजार मैदानावर आयोजित सभेत ते बोलत होते. या सभेला मोठा जनसागर उसळला होता.
शिंदे यांनी पुढे सांगितले की, “शिवसेनेने नेहमीच सामान्य माणसाच्या प्रश्नांना प्राधान्य दिले आहे. माझी लाडकी बहिण योजना, महिलांसाठी मोफत उच्च शिक्षण, सरकारी कागदपत्रांवर आईचे नाव अनिवार्य करणे यांसारखे निर्णय हे जनाभिमुख शासनाचे प्रतीक आहेत.”
जुन्नर येथील सभेनंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी चाकण येथे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मनीषा गोरे यांच्या प्रचारार्थ आयोजित भव्य रोड शोमध्येही सहभाग घेतला. या रोड शोला मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. चाकण ते जुन्नर परिसरात भगवी लाट दिसून आली.
नगरविकास खात्याकडून जुन्नरमध्ये महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी 140 कोटींचा निधी मंजूर केल्याचे शिंदे यांनी सभेत सांगितले.
“जुन्नरचा कायापालट करण्याचा निर्धार केला आहे. पर्यटन, विकासकामे, पायाभूत सुविधा, रोजगार या सर्व क्षेत्रांमध्ये ठोस बदल होणार आहेत,” असे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी नागरिकांना आवाहन करताना म्हटले, “उद्या होणारे मतदान ही फक्त निवडणूक नसून, जुन्नरच्या विकासाचा निर्णय आहे. शिवसेनेच्या अधिकृत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुजाता काजळे यांना तसेच सर्व उमेदवारांना विजयी करा.”
……..








