
बदलापूर, ता. 29 : बदलापूरच्या विकासाची गंगा गेल्या काही वर्षांत वाहू लागल्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. पराभव डोळ्यासमोर दिसू लागल्याने विरोधक बेचैन झाले आहेत. मात्र आगामी निवडणुकीत शिवसेनेचा विजय निश्चित असल्याचा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.“बदलापूर म्हणजे दिघे साहेबांचा श्वास, बदलापूर म्हणजे बाळासाहेबांचा प्राण आणि बदलापूर म्हणजे फक्त धनुष्यबाण,” असे एकनाथ शिंदे यांनी ठणकावून सांगितले.
बदलापूर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून राज्यभरात शिवसेनेच्या सभांना जनतेचा मोठा पाठिंबा मिळत असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. विधानसभेप्रमाणेच येथेही शिवसेनेला प्रचंड लोकसमर्थन मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
बदलापूर नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेच्या विना म्हात्रे तसेच नगरसेवक पदासाठीच्या ४९ उमेदवारांच्या प्रचारार्थ घोरपडे मैदानावर आयोजित सभेत ते बोलत होते. सभेला कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. शिंदे यांच्या भाषणादरम्यान घोषणांनी मैदान दणाणून गेले.
या निवडणुकीत शिवसेनेची ५० उमेदवारांची “हाफ सेंच्युरी टीम” मैदानात असून बदलापूरमधून शिवसेनेचा विक्रमी विजय होणार, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. नगराध्यक्ष पदासाठी विना वामन म्हात्रे तर ४९ नगरसेवक अशा एकूण ५० उमेदवारांची फळी उभी आहे, असे सांगत त्यांनी “काम बोलणार, आरोप नव्हे” असा संदेश कार्यकर्त्यांना दिला.
मुख्यमंत्री शिंदे यांनी शीतल प्रवीण राऊत या शिवसेनेच्या नगरसेविका बिनविरोध निवडून आल्याचा उल्लेख करत, “शीतल ताईंच्या बिनविरोध विजयानं शिवसेनेचं खाते शुभसंकेताने उघडलं आहे. पुढचा संपूर्ण निकालही याच वातावरणात येईल,” असा विश्वास व्यक्त केला.
“बदलापूर म्हणजे फक्त आणि फक्त धनुष्यबाण. इथं आवाज घुमणार तो फक्त शिवसेनेचाच,” असे सांगत मुख्यमंत्री म्हणाले, “आपण सगळे एक कुटुंब आहोत. माझ्या लाडक्या बहिणी एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत, हा माझ्यासाठी सगळ्यात मोठा विश्वासाचा ठेवा आहे.”
शिवसेनेच्या कारकिर्दीत बदलापूरमध्ये केलेल्या विकासकामांचा तपशीलही शिंदे यांनी उपस्थितांसमोर मांडला. शहरासाठी सुमारे ५०० कोटींचा विकासनिधी, २४० कोटींची पाणीपुरवठा योजना, प्रशासकीय इमारत, गावदेवी रोड, पंचवटी पूल, अॅडव्हान्स फायर सिस्टीमसाठी साडेतेरा कोटी रुपये, कचरा प्रकल्पाचे ७० टक्के काम पूर्ण, शिलाहार–पोशीर येथे नवे धरण उभारणार, उल्हासनदीवरील पूरनियंत्रण, मेट्रो व रेल्वे कनेक्टिव्हिटीसाठी प्रयत्न आदी कामांचा त्यांनी उल्लेख केला.
“लोकांना काम दिसलं की टीकेला काही अर्थ राहत नाही, म्हणून मी आरोपांना उत्तर न देता कामातून उत्तर देतो,” असे सांगत, “बदलापूरमध्ये शेकडो कोटींची कामं झाली आहेत. उरलेल्या कामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही,” अशी हमी त्यांनी दिली.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ या योजनेचा उल्लेख करत शिंदे म्हणाले, “बदलापूरमधील लाखो लाडक्या बहिणी या योजनेचा लाभ घेत आहेत. सर्व जातीधर्मांसाठी खुली असलेली ही योजना कुटुंबाचा कणा मजबूत करण्याचा प्रयत्न आहे.”
मुलींच्या शिक्षणाबाबत सरकारने घेतलेल्या निर्णयाचा उल्लेख करत शिंदे म्हणाले, “पूर्वी सरकार ५० टक्के फी भरत होतं; उरलेल्या फीमुळे एका मुलीने आत्महत्या केली. ती बातमी पाहून एका रात्रीत निर्णय घेऊन मुलींच्या उच्चशिक्षणासाठी १०० टक्के फीमाफी जाहीर केली.”
तसेच एसटी प्रवासात महिलांसाठी सवलत, आईचे नाव लावण्याचा ऐतिहासिक निर्णय, मुख्यमंत्री सहायता निधीतून हजारो रुग्णांना मदत, ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमातून लाखो लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचवल्याचा त्यांनी उल्लेख केला.
बदलापूरमधील काही करदंड व शास्तीबाबत नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेऊन ते म्हणाले, “हे गरीब आणि सर्वसामान्यांचे सरकार आहे. नगरविकास विभागाकडून या शास्तीचा पुनर्विचार करून ती कमी करण्यात येईल.”
निवडणूक प्रक्रियेत प्रशासनाने कोणत्याही खोट्या तक्रारींना बळी पडू नये, अशी सूचना करताना त्यांनी चेतावणी दिली.
“आमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही. जो अन्याय करेल, त्याला दूर करण्याचं काम एकनाथ शिंदे करेल.”
“इतकी मोठी टीम, एवढी विकासकामं, लोकांमधलं प्रेम — याच्या जोरावर विरोधकांचे डिपॉझिटही जप्त होणार. बदलापूरमध्ये शिवसेनाला हरवणं ‘मुश्किलच नाही… नामुमकीन आहे’, असा दावा करत मुख्यमंत्री म्हणाले, “दोन तारखेला फक्त धनुष्यबाण या निशाणीवर बटन दाबा, विना वामन म्हात्रे यांना नगराध्यक्ष करा, आमचे ४९ नगरसेवक निवडून द्या आणि बदलापूरवर भगवा फडकवा असे आवाहन केले.”
……







