
ठाणे – देशपातळीवरील वोटचोरीचा प्रकार उघडकीस आलेला असतानाच आता ठाण्यात चक्क मतदार पळवा-पळवी उघडकीस आली आहे. भूभाग ज्या प्रभागात आहे. त्या प्रभागात मतदान करण्याचा मतदारांचा हक्क हिरावून तो दुसर्या प्रभागात वर्ग केला असल्याचा प्रकार राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी पत्रकार परिषदेत उघडकीस आणला आहे. दरम्यान, या संदर्भातील सर्व पुरावे सोमवारी निवडणूक अधिकाऱ्यांना सादर करणार आहोत. त्यानंतरही दुरूस्ती केली नाही तर संबधित अधिकाऱ्यांना काळे फासू, असा इशाराही प्रधान यांनी दिला.
ठाणे महानगर पालिकेच्या निवडणुका लवकरच घेतल्या जाणार आहेत. या निवडणुकांच्या अनुषंगाने मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पारूप मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या असून त्यामध्येच घोळ घातला असल्याचे उघडकीस आले आहे. त्याचा पर्दाफाश आज प्रधान यांनी केला. या पत्रकार परिषदेस य युवक कार्याध्यक्ष राजेश जाधव, मकसूद खान, जतीन कोठारे, दीपक क्षत्रिय, सचिन पंधरे आदी उपस्थित होते.
मनोज प्रधान यांनी दोन प्रभागातील मतदार चोरी पुराव्यासह उघडकीस आणली आहे. त्यांनी सांगितले की, राबोडी प्रभाग क्रमांक 10 मध्ये गेल्या अनेक निवडणुकीत समाविष्ट असलेल्या बापूजी नगर येथील मतदारांना प्रभाग क्रमांक 11 मध्ये वर्ग करण्यात आले आहे. हे करीत असताना भूभाग मात्र प्रभाग क्रमांक 10 मध्येच ठेवण्यात आला आहे. म्हणजेच, प्रभाग क्रमांक 10 मध्ये राहणाऱ्या 2680 मतदारांना प्रभाग क्रमांक 11 मधील उमेदवारांसाठी मतदान करावे लागणार आहे. यामागे सत्ताधारी वर्गाचा प्रशासनावर असलेला दबाव कारणीभूत आहे. राबोडी भागात क्लस्टर डेव्हलपमेंट करण्यात येणार आहे. त्यास बापूजी नगरमधील नागरिकांचा विरोध आहे. त्यामुळेच त्यांना प्रभाग क्रमांक 10 मधून प्रभाग क्रमांक 11 मध्ये हाकलण्यात आले आहे, असा आरोप मनोज प्रधान यांनी केला. तर, जतीन कोठारे यांनी, अनेक मतदारांचे फोटो आणि नावे गायब करण्यात आलेली आहेत. त्यामुळे बोगस मतदानाची शक्यता बळावली आहे, असे सांगितले.
दरम्यान, हा प्रकार वोटचोरीप्रमाणेच गंभीर आहे. सत्ताधाऱ्यांना नको असलेले मतदार भलतीकडेच वर्ग करायचे किंवा विरोधकांना सकारात्मक असलेले मतदार सत्ताधारी उमेदवाराला फायदेशीर ठरतील, या प्रकारे पळवायचे, असा कट प्रशासनाने सत्ताधाऱ्यांच्या सांगण्यावरून केला आहे. जर, अशा पद्धतीने निवडणुका घेण्यात येणार असतील तर लोकशाहीचे अस्तित्व राहिल का? असा सवाल करून अंतिम मतदारयादीत फेरबदल न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष तीव्र जनआंदोलन उभे करेल, असा इशाराही मनोज प्रधान यांनी दिला आहे.







