
कराड, ता. 28 : “ज्यांनी लावली कराडची वाट त्यांना दाखवा नारळ देऊन घरची वाट,” असा घणाघात करत “कराडच्या विकासाचा झेंडा हाच आपला अजेंडा आहे” असे ठाम प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
कराड मंगळवार पेठेतील जाहीर सभेत ते बोलत होते. शिवसेना प्रणित यशवंत विकास आणि लोकशाही आघाडीचे उमेदवार राजेंद्रसिंह यादव यांच्यासह नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी निवडून आणत नगरपरिषदेवर विजयी पताका फडकवा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच मलकापूर नगर परिषदेचे उमेदवार अक्षय मोहिते यांनाही भक्कम मतांनी विजयी करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
सभेला महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती पाहून शिंदे यांनी समाधान व्यक्त केले. “मी मुख्यमंत्री असताना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’, ‘लेक लाडकी लखपती योजना’, एसटीमध्ये ५० टक्के सवलत, मुलींसाठी उच्च शिक्षण मोफत, अशा अनेक योजना राबवल्या. त्या बंद होणार नाहीत, कोणी कितीही प्रयत्न केला तरी त्या सुरूच राहतील,” “मी जे बोलतो ते करतो, आणि जे होत नाही ते बोलत नाही. एकदा कमिटमेंट केल्यावर मी स्वतःचीही ऐकत नाही,” अशा शैलीत त्यांनी भाषण रंगवले.
कराडच्या विकासासाठी आतापर्यंत ३२५ कोटी रुपयांचा निधी दिल्याचा दावा त्यांनी केला. यात पाणीपुरवठ्यासाठी ६४ कोटी, ड्रेनेज योजनांसाठी ९६ कोटी २८ लाख, रस्ते विकासासाठी १०० कोटी ५८ लाख, सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेसाठी १३ कोटी, आण्णाभाऊ साठे योजनेसाठी ७ कोटी, जिल्हा नियोजनातून ३४ कोटी असा निधी वितरित झाल्याचे त्यांनी सांगितले. “ही उपकाराची भाषा नाही. हा पैसा जनतेचा आहे आणि तो जनतेवर खर्च होणारच. ही जबाबदारी आहे,” असेही ते म्हणाले.
“ही निवडणूक कुणाविरोधात नाही, ही विकासाची निवडणूक आहे. कराड शहराचा विकास हा आपला वनलाइन अजेंडा आहे. बाकी काही नाही,” असे सांगत त्यांनी “एकदा सत्ता बदलून बघा, विकास कसा केला जातो ते दाखवतो,” असा शब्द जनतेला दिला.
“नारळ आणि छत्री ही चिन्हे डोळ्यासमोर ठेवा आणि मतदान करा. ज्यांनी कराडची वाट लावली त्यांना नारळ देऊन घरची वाट दाखवा,” असा पुन्हा जोरदार हल्लाबोल त्यांनी विरोधकांवर केला.
सभेअखेर मलकापूर नगर परिषदेचे उमेदवार अक्षय मोहिते यांना समर्थन देत “दिवंगत संजय मोहिते हे समर्पित कार्यकर्ते होते. अक्षय मोहिते यांच्या पाठीशी संपूर्ण ताकद उभी आहे,” असा उल्लेख करत शिंदे यांनी सर्वांना मतदानासाठी आवाहन केले.
“कराड माझ्यासाठी केवळ मतदारसंघ नाही तर माझ्या जन्मभूमीचा सन्मान आहे. या शहरासाठी जे काही शक्य आहे ते मी करणार,” अशा शब्दांत त्यांनी भाषणाचा समारोप केला.
…….







