
“
श्रीरामपूर, ता. 24 : निवडणुकीचं वातावरण आपल्या बाजूचं आहे, पण गाफील राहू नका. श्रीरामपूर आपल्या ताब्यात ठेवायचं असेल तर शिवसेना आणि धनुष्यबाणाशिवाय पर्याय नाही. यासाठी श्रीरामपूरवर भगवा फडकवण्याचा निर्धार करा, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीरामपूर येथील श्री राम मंदिर चौकात आयोजित नगरपरिषद निवडणुकीच्या जाहीर सभेत केले.
एक मत इतिहास घडवू शकतं, त्यामुळे श्रीरामपूरची जनता प्रतिस्पर्ध्यांना पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास शिंदेंनी व्यक्त केला. श्रीरामपूरमध्ये दुरंगी, तिरंगी किंवा चौरंगी लढत झाली तरी इथे केवळ भगव्याचाच रंग चालणार आहे. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रकाश चित्ते यांच्यासह महायुतीचे सर्व उमेदवार प्रचंड मतांनी विजयी करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
राज्यात फिरताना नगरपरिषद निवडणुकीत प्रचंड उत्साह दिसत असल्याचे सांगत शिंदे म्हणाले की, भावाच्या बहिणींना पंधराशे रुपये देऊन आम्ही थांबणार नाही, तर त्यांना लखपती केल्याशिवाय महायुती सरकार शांत बसणार नाही. आपण दिलेला शब्द पाळणारा नेता असल्याचा दावा करत त्यांनी सांगितले की, माझ्यावर विश्वास ठेऊन 50 आमदार माझ्यासोबत आले आणि राज्यात सत्ता परिवर्तन घडवून लोकांचे सरकार आणले.
स्पीड ब्रेकर सरकारमुळे राज्याचा विकास थांबला होता, मात्र मी कार्यभार स्वीकारल्यानंतर विकासातील सर्व अडथळे दूर करून प्रकल्पांना चालना दिली आणि अनेक प्रकल्प पूर्ण केले, काही सुरू आहेत, असे शिंदे यांनी सांगितले. लोकाभिमुख योजना राबवून पायाभूत सुविधा उभारल्या जात असून युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसला मतदान न करण्याचं आवाहन केलं होतं, पण काँग्रेसशी हातमिळवणी करून शिवसेनेला दावणीला बांधण्याचं पाप काहींनी केलं, असा अप्रत्यक्ष टोला शिंदेंनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
पंढरपूर येथे आषाढी एकादशीला लाखो वारकऱ्यांनी घोषणाबाजी करून सत्तांतराला समर्थन दिल्याचा दावा त्यांनी केला. वारकऱ्यांसाठी विमा योजना आणि आरोग्य सुविधा उभारण्याचं महत्वपूर्ण काम महायुतीने केले असे त्यांनी सांगितले.
श्रीरामपूरसाठी 178 कोटी रुपये पाणीपुरवठा योजनेसाठी मंजूर केल्याचे त्यांनी सांगितले. प्रवरा डावा कालवा काम सुरू असल्याचे आणि बाजारपेठेत तोडलेल्या दुकानांचे पुनर्वसन करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. भुयारी गटार योजनेतील 65 कोटींच्या भ्रष्टाचाराची चौकशी होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सभेला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला.
…..







