
“खरा ब्रँड बाळासाहेबच; बाकीच्यांचा बँड लवकरच वाजेल!”
बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी एकनाथ शिंदेंची राजकीय फटकेबाजी
“सवंगड्यांना घरगडी समजू नका!”
शिंदेंचा उद्धव–राज ठाकरेंवर प्रहार
मुंबई : वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त मिरा-भाईंदरमध्ये उभारलेल्या त्यांच्या भव्यदिव्य स्मारक आणि कलादालनाच्या लोकार्पण सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नाव न घेता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर ‘सर्जिकल स्ट्राईक’ शैलीत झणझणीत हल्ला चढवला. “शिवसेनेचा खरा ब्रँड एकच – बाळासाहेब ठाकरे! बाकी जे स्वतःला ब्रँड म्हणवत आहेत त्यांचा बँड जनता वाजवेल आणि त्यांना शेवटच्या स्टॅण्डमध्ये बसवेल,” असा कडक इशारा त्यांनी दिला. “काहीजण सवंगड्यांना घरगडी समजू लागलेत; आता तरी आत्मपरीक्षण करा,” असा संदेश देत त्यांनी थेट टोला लगावला.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नातून उभारलेल्या वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कलादालन आणि स्मारकाचे लोकार्पण करताना शिंदे यांनी प्रताप सरनाईक, नरेश म्हस्के, आयुक्त राधा विनोद शर्मा, पूर्वेश आणि विहंग सरनाईक, विक्रमप्रताप सिंह, पूजा आमगावकर, निशा नार्वेकर यांसह सर्व मान्यवरांचे अभिनंदन केले.
दादरच्या चाळीचा हुबेहूब केलेला देखावा, नवीन तंत्रज्ञानावर आधारित कलादालन आणि खांडके बिल्डिंगचा पुनर्भास पाहून “इथं पाऊल ठेवलं की बाळासाहेब समोर उभे आहेत असा भास होतो,” असे ते म्हणाले. भाषणात त्यांनी नाव न घेता ‘स्वतःचा ब्रँड’ सांगणाऱ्यांवर, आंदोलनाच्या केसेसेना घाबरणाऱ्यांवर आणि सवंगड्यांना घरगडी बनवणाऱ्यांवर रोखठोक टीका केली. “महाराष्ट्राच्या मनात एकच ब्रँड – बाळासाहेब ठाकरे; बाकीच्यांचा बँड लवकरच वाजेल,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
यावेळी त्यांनी आपल्या सरकारच्या निर्णयांचा उल्लेख करत “मी शब्द दिला की मागे फिरत नाही” असे नमूद केले. माझी लाडकी बहीण योजना सुरूच राहील, बंद पडलेली कारशेड व मेट्रोची कामे सुरु केली, राज्यातील स्थगिती हटवून प्रकल्प गतिमान केले, टोलनाके हटवून नागरिकांची गैरसोय कमी केली, वॉटर टॅक्सी, सी-लिंक कॉरिडॉर यांसारखे विकास प्रकल्प पुढे नेले आणि मीरा-भाईंदरमध्ये एमपीएससी–युपीएससी केंद्र सुरू करण्याचा निर्धार व्यक्त केला. “एकदा कमिटमेंट केली की मी स्वतःचं ऐकत नाही,” या डायलॉगवर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. “शिवसेनेत सर्वात मोठं पद म्हणजे शिवसैनिक; कुणी मालक नाही, कुणी नोकर नाही,” असे सांगत त्यांनी पक्षाची ‘परिवार’ ही ओळख पुन्हा अधोरेखित केली.
कलादालनातील प्रदर्शित भाषणांनी “बाळासाहेब इथेच उभे राहून बोलत आहेत” असा भावनिक अनुभव देत असल्याचे शिंदे म्हणाले. पूर, आपत्ती आणि विविध संकटांमध्ये शिवसैनिकांनी दाखवलेल्या सेवाभावाची आठवण त्यांनी करून दिली. कोविड काळातील अमोघ आमगावकर यांचा त्याग ते चिपळूण, कोल्हापूर, महाड, उत्तराखंडमधील मदतकार्य—या सर्वांचा उल्लेख त्यांनी केला. शेवटी त्यांनी “जे बाळासाहेबांचे विचार सोडून गेले, त्यांनी स्वतःलाच विचारावं,” आणि “धनुष्यबाण सोडून दावणीला बांधणाऱ्यांचे धोरण महाराष्ट्र ओळखतो,” असे सांगत आणखी एक राजकीय टोला लगावला.
हिंदुत्वाचा वारसा उलगडताना “जो राम का नहीं – वो किसी काम का नहीं” असे म्हणत त्यांनी मोदींनी राममंदिर उभारून बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण केल्याचा उल्लेख केला आणि जय श्रीरामचा नारा देत भाषण संपवले. एकूणच, शिंदे यांच्या आजच्या भाषणात बाळासाहेबांच्या वारशाचे राजकारण करणाऱ्यांना कडक इशारा, स्वतःच्या नेतृत्वाचा आक्रमक प्रत्यय, प्रताप सरनाईक यांच्या कामाचे कौतुक, विकासकामांचे रिपोर्ट कार्ड, शिवसैनिकांबद्दलचा भावनिक संदेश आणि हिंदुत्वाच्या घोषणांचा जोरदार संगम दिसून आला.
…..







