आरएसएसवर बंदी घालण्याचे वक्तव्य दुर्दैवी; संघ नेहमी राष्ट्रसेवेसाठी तत्पर
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्टोक्ती
ठाणे, ता. 21 : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक कडवट देशभक्त आणि राष्ट्रभक्त संघटना आहे. देशावर संकट कोसळले की आरएसएस नेहमी मदतीसाठी पुढे सरसावते. आरएसएसवर बंदी घालण्याबाबतचे वक्तव्य हे दुर्दैवी आणि निषेधार्ह असल्याचे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. ते ठाणे येथे पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते.
स्वबळावर निवडणुका लढवण्याची घोषणा करणाऱ्या नेत्याबद्दल विचारले असता शिंदे म्हणाले की, “लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्षाला आपला निर्णय घेण्याचा अधिकार आहे. हा ज्याचा त्याचा निर्णय असतो. मात्र, महायुती म्हणून आम्ही लोकसभा निवडणुका जिंकल्या आणि विधानसभेत प्रचंड बहुमत मिळवले आहे. त्यामुळे स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही महायुतीचाच भगवा डौलाने फडकेल,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना शिंदे म्हणाले की, “लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही. लाडक्या बहिणींना भाऊबीज मिळणारच आणि ही योजना अखंडपणे सुरू राहणार आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.











