
ठाणे महानगरपालिकेत झाली प्रभाग रचनेचा प्रारूप आराखड्यावरील हरकती व सूचनांवरील सुनावणी
• लोकप्रतिनिधी, नागरिक यांनी मांडल्या २७० हरकती आणि सूचना *ठाणे (१०) :* महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेने ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा जाहीर करण्यात आला आहे. या प्रारुप आराखड्यावर एकूण २७० हरकती आणि सूचना मांडण्यात आल्या. या हरकती व सूचनांच्या सुनावणीसाठी राज्य शासनाने अपर मुख्य सचिव (परिवहन व बंदरे) संजय सेठी यांना प्राधिकृत केले आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी महापालिका मुख्यालय येथील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे प्रत्यक्ष सुनावणी झाली. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९च्या कलम ५ (३) च्या तरतुदीखाली ठाणे महानगरपालिकेच्या बाबतीत निवडावयाच्या सदस्यांची संख्या व प्रभागांची संख्या निश्चित केली आहे. ठाणे महानगरपालिकेत एकूण सदस्यांची संख्या १३१ आहे. एकूण प्रभागांची संख्या ३३ आहे. त्यापैकी, चार सदस्यीय प्रभागांची संख्या ३२ असून तीन सदस्यीय प्रभागांची संख्या १ आहे. प्रारुप अधिसूचनेद्वारे ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती निश्चित करण्यात आली आहे. या अधिसूचनेच्या अनुषंगाने नागरिकांना ०४ सप्टेंबरपर्यंत हरकती किंवा सूचना मांडण्याचा अवधी देण्यात आला होता. या अवधीत काळात नोंदवण्यात आलेल्या हरकती आणि सूचना यांच्यावर बुधवारी प्रत्यक्ष सुनावणी झाली. या सुनावणीसाठी व्यासपीठावर, महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त (निवडणूक) उमेश बिरारी, सहाय्यक संचालक, नगररचना संग्राम कानडे, सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे, कार्यकारी अभियंता देवेंद्र नेर आदी उपस्थित होते.
प्रभाग समितीनिहाय – हरकती आणि सूचना
माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती – ५९
दिवा प्रभाग समिती – १२२
मुंब्रा प्रभाग समिती – ०८
कळवा प्रभाग समिती – ०४
वागळे प्रभाग समिती – ०१
नौपाडा-कोपरी प्रभाग समिती – ४३
लोकमान्य नगर – सावरकर नगर प्रभाग समिती – ०३
उथळसर प्रभाग समिती – १७
वर्तक नगर प्रभाग समिती – १३
एकूण – २७०