
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली राज ठाकरे यांच्या गणपती बाप्पाचे दर्शन
गणेशोस्तवानिमित्त कुटुंबीय एकत्र आले यांचा आनंदच
मुंबई: – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दादर येथील शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन आज श्री गणेशाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी राज यांची सदिच्छा भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.
दर्शनानंतर प्रसिद्धी माध्यमांशी शिंदे यांनी संवाद साधला, यावेळी त्यांनी आम्ही दरवर्षी राज यांच्या घरी श्री गणेशाचे दर्शन घेण्यासाठी येतो मात्र यंदा इतरही काही जण आले आणि यानिमित्ताने कुटुंब एकत्र आले यांचा आनंद वाटत असल्याचे मत व्यक्त केले. खिजगणतीत नसलेल्यांची आणि संपलेला पक्ष अशी ज्यांची हेटाळणी केली त्यांच्याकडे आज यावे लागत आहे हे चांगलेच आहे असे मत शिंदे यांनी व्यक्त केले. राज यांच्याशी झालेल्या बैठकीत अनेक विषयांवर आमच्या चर्चा झाल्या मात्र सगळ्याच गोष्टी आजच सांगून टाकणं योग्य नाही काही योग्य वेळी तुम्हाला कळतील असे मत शिंदे यांनी व्यक्त केले.
यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यांच्या पत्नी सौ. शर्मिला राज ठाकरे, मनसे नेते नितीन सरदेसाई, शिवसेनेचे माजी आमदार सदा सरवणकर हेदेखील उपस्थित होते.