
मायभूमीसाठी रक्त सांडणाऱ्या वीरांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले रक्तदान
सिन्दुर महारक्तदान यात्रेत स्वतः रक्तदान करून नोंदवला सहभाग
शिवसेनेच्या चंद्रहार पाटलांच्या साथीने शिंदे यांचेही रक्तदान
भारतीय सैन्यदलाप्रती व्यक्त केली कृतज्ञता
जम्मू आणि काश्मीर (श्रीनगर) : – भारतीय सैन्यदलाच्या ९२ बेस हॉस्पीटलला भेट देऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः रक्तदान करून सिन्दुर महारक्तदान यात्रेत सहभाग नोंदवला. ऑपरेशन सिन्दुरच्या यशानंतर भारतीय सैन्य दलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
सांगली येथील शिवसेनेचे चंद्रहार पाटील यांनी या ‘ सिन्दुर महारक्तदान यात्रे’ च्या आयोजनासाठी पुढाकार घेतला असून त्यांच्यासह सांगली जिल्ह्यातील एक हजार पैलवान या यात्रेमध्ये प्रत्यक्ष सहभागी झाले आहेत. ऑपरेशन सिन्दुर यशस्वी झाल्यानंतर भारतीय सैन्यदलाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांनी श्रीनगर येथे जाऊन रक्तदान करण्याचा निर्धार केला होता. त्यानुसार ते आणि त्यांचे सर्व सहकारी दोन दिवसांपूर्वीच श्रीनगर येथे पोहोचले आहेत.
या यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील आज श्रीनगर येथे आले. आज इथे पोहोचताच त्यांनी थेट ९२ बेस हॉस्पीटलला भेट देऊन रक्तदान केले. यावेळी शिंदे यांच्यासोबतच चंद्रहार पाटील यांनीही रक्तदान केले. तसेच यावेळी शिंदे यांनी ऑपरेशन सिन्दुर मध्ये भारतीय सैन्यदलाने दाखवलेल्या अतुलनीय शौर्याबद्दल त्यांचे देशवासियांच्या वतीने अभिनंदन करून त्यांचे आभार मानले. तुम्ही इथे दक्ष असता म्हणून आम्ही सुखाने जगू शकतो असे सांगत प्रत्येक सैनिकाप्रती त्यांनी कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. तसेच यावेळी सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांनी रक्तदान केल्याबद्दल शिंदे यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित केले. तसेच शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या महारक्तदान शिबिराचे आयोजन केल्याबद्दल शिंदे यांचे आभार मानले.
यावेळी शिवसेनेचे चंद्रहार पाटील आणि भारतीय सैन्य दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.