
राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना कटिबध्द
शिवसेना प्रणित शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी उपुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधला संवाद
शेतकऱ्यांची संघटना अधिक भक्कम करून राज्यात सर्वदूर काम करण्याचा शिवसेनेचा निर्धार
मुंबई :- राज्यातील शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सरकारच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या माध्यमातून करू, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. जालिंधर पाटील यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याशी संवाद साधला. यावेळी शिवसेना प्रणित शेतकरी संघटनेची व्याप्ती राज्यभर वाढवून जिल्हानिहाय शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
राज्यातील शेतकरी सध्या मोठ्या अडचणीत असून विदर्भ आणि मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे यावर सरकारच्या माध्यमातून ठोस उपायोजना करण्याचे निश्चित करण्यात आले. तसेच काही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शिवसेनेच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात मदत करण्याचे निश्चत करण्यात आले. तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी देणे, केरळ सरकारच्या धर्तीवर १६ भाजीवर्गीय पिकांना शासन हमीभाव देणे, साडे सात एचपी पर्यंत वीज बिल माफ करणे यासारख्या प्रश्नांवर यावेळी चर्चा करण्यात आली.
यावेळी केरळ सरकारने १६ भाजीवर्गीय पिकांना शासन हमीभाव देताना नक्की कोणते निकष ठरवले आहेत, याचा अभ्यास करण्यासाठी अभ्यासगट तयार करून केरळला पाठवू, त्यात शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून शेतकरी नेते जालिंदर पाटील यांनाही पाठवू असे शिंदे यांनी सांगितले. तसेच एकरकमी एफआरपी मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर बैठक घेऊन प्रयत्न करू, शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून सरकारमार्फत विशेष उपायोजना करू असेही सांगितले. तसेच शेतकरी आंदोलनात संघटनेच्या ज्या सदस्याविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत त्यातील अतीगंभीर गुन्हे वगळता इतर गुन्हे मागे घेऊ, शेतकऱ्यांचे प्रश्नांचे जिल्हानिहाय वर्गीकरण करून ते मंत्री उदय सामंत यांच्यामार्फत आपल्याकडे दिल्यास शासनाच्या माध्यमातून तेही नक्की सोडवू असे शिंदे यांनी सांगितले. तसेच शेतकऱ्यांचा विविध प्रश्नासाठी सुरू असलेला हा लढा अधिक व्यापक करून राज्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहचवण्यासाठी अधिक सक्षमपणे काम करण्याचा निर्धार शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी शिवसेनाप्रणित शेतकरी संघटनेचे जालिंदर पाटील, वैभव कांबळे, विकास देशमुख, समाधान फाटे, प्रशांत डीक्कर, रवींद्र इंगळे, गजानन पाटील आणि इतर सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.