
“दादासाहेबांचं स्मारक लोकशाहीचं मंदिर; त्यांच्या संघर्षाला खरी आदरांजली”
आंबेडकरी चळवळीच्या मौलिक विचारांच्या स्मरणाचा आणि लोकशाही मूल्यांच्या दृढीकरणाचा क्षण
दिवंगत दादासाहेब गवई यांच्या स्मारकाच्या उद्घाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
अमरावती | ता. 30 :
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांकडून थेट बाळकडू घेणारे, विचारांची शिदोरी घेऊन तळपणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे दादासाहेब रा.सू. गवई. एका व्यक्तीच्या स्मारकाचा हा सोहळा नाही, तर आंबेडकरी विचारांच्या संघर्ष व सेवेला उभारलेलं लोकशाहीचं मंदिर आहे. आज लोकशाहीचे चारही स्तंभ संसद, प्रशासन, न्यायव्यवस्था आणि माध्यमे येथे एकत्र आले आहेत, हा योगायोग नाही; तर दादासाहेबांच्या कार्याचा लौकिकच तसा आहे, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.
दिवंगत दादासाहेब गवई यांच्या स्मारकाचे उद्घाटन आज अमरावतीत पार पडले. या वेळी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मातोश्री कमलताई गवळी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
दादासाहेब रा.सू. गवई यांच्या स्मारकाचे लोकार्पण हा केवळ औपचारिक कार्यक्रम नसून आंबेडकरी चळवळीच्या मौलिक विचारांच्या स्मरणाचा व लोकशाही मूल्यांच्या दृढीकरणाचा क्षण आहे, असा संदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.
शिंदे म्हणाले, “आज दादासाहेबांचा स्मृतिदिन. ते शारीरिकरित्या आपल्यात नसले तरी त्यांचे संस्कार, मूल्ये आणि वारसा आपल्या सोबत आहेत. समाजमान्यता, निष्ठा, प्रामाणिक नेतृत्व म्हणजे दादासाहेब. 2018 मध्ये भूमिपूजन आणि आज लोकार्पण दोन्हीही काळात देवेंद्रजी मुख्यमंत्री होते. हे स्मारक केवळ काँक्रिटचे नाही; तर मानवतेच्या विचारांनी बांधलेले आहे.”
दादासाहेबांची सौंदर्यदृष्टी, वक्तृत्व आणि कर्तृत्व यांची आठवण करून देत शिंदे म्हणाले की, “त्या स्मारकात प्रवेश केला आणि सकारात्मक ऊर्जा जाणवली. संग्रहालय, अत्याधुनिक ऑडिटोरियम आणि 15 फुटी पुतळा यामुळे हा परिसर प्रेरणास्थान ठरेल.”
दलित, शोषितांसाठी लढणारे दादासाहेब गवई यांचे जीवन शिंदे यांनी उजाळले. “राजकीय वारसा नसताना 30 वर्षे आमदार, लोकसभा, राज्यसभा सदस्य, बिहार-केरळ-सिक्कीमचे राज्यपाल अशी प्रचंड कारकीर्द त्यांनी गाजवली. स्वाभिमानाने, मूल्यांवर उभे राहून त्यांनी जनतेचा विश्वास जिंकला.”
अटल बिहारी वाजपेयींच्या दौर्यातील त्यांच्या मनाच्या मोठेपणाची आठवण, संविधान रक्षणासाठी निर्भीड भूमिकेचे कौतुक करत शिंदेंनी सांगितले, “सत्ता क्षणभंगुर असते; सेवा आणि मानवता कायमची असते, हे दादासाहेबांनी शिकवले.”
दीक्षाभूमीच्या विकासात आणि नवबौद्ध चळवळीत दादासाहेबांचे योगदान अधोरेखित करत शिंदे म्हणाले, “समाजहितासाठी आयुष्य दिलेल्या दादासाहेबांचे काम स्मारकातून जनतेला प्रेरणा देत राहील. त्यांच्या संघर्षाला आणि सेवेला ही खरी आदरांजली असल्याचे शिंदे यांनी सांगितले.”
……









