
“शिवसेना तळागाळातील कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील”
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
विविध जिल्ह्यांतील 14 गटांचा मुक्तागिरी निवासस्थानी शिवसेनेत जाहीर प्रवेश
मुंबई, दि. 10 : “शिवसेना तळागाळातील कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील” असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
मुंबई येथील मुक्तागिरी निवासस्थान येथे आज विविध जिल्ह्यांतील 14 संघटना, गट आणि पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच लोकप्रतिनिधी यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या या भव्य प्रवेश सोहळ्यात सर्व नवागतांचे पक्षात मनःपूर्वक स्वागत करण्यात आले.
या प्रवेश सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे माजी आमदार सुधाकर भालेराव, कोळी समाजातील वरळी कोळीवाडा येथील विविध बंधू-भगिनी, तसेच लातूरचे महापौर, बीड, पुणे, बारामती, श्रीरामपूर, देवळाली, उल्हासनगर, सांगली, तासगाव, कोल्हापूर, चंदगड आदी जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांनीही मोठ्या संख्येने शिवसेनेत प्रवेश केला. तसेच या वेळी पुणे जिल्हा महाराष्ट्र ब्राह्मण सभा प्रदेशाध्यक्ष मयुरेश आरगडे, प्रकाश वाघ, सागर कुलकर्णी, मुंबईतील मराठा स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दत्ताजी देसाई, किसान काँग्रेसचे संग्राम चव्हाण, शबरी माता संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्षा लतिका गोपाळे, येवला राष्ट्रवादी काँग्रेसचे नानासाहेब बुराडे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांचे स्वागत करताना सांगितले, “शिवसेना ही कार्यकर्त्यांची पक्षसंस्था आहे. जो काम करेल, त्याचा सन्मान वाढेल. सर्वसामान्य, मागासवर्गीय आणि तळागाळातील लोकांच्या विकासासाठी शिवसेना नेहमी अग्रस्थानी राहील.”
ते पुढे म्हणाले, “दररोज राज्यभरातून हजारो कार्यकर्ते शिवसेनेत दाखल होत आहेत. हा विश्वास आमच्यासाठी सर्वात मोठी प्रेरणा आहे. मी मुख्यमंत्री असतानाही कार्यकर्ता म्हणूनच काम केलं आणि आजही तसेच काम करत आहे. हा पक्ष कोणा मालक-नोकरांचा नाही; तर कार्यकर्त्यांचा आहे. जो शब्द दिला, तो मी नेहमी पाळतो आणि म्हणूनच लोक आज शिवसेनेच्या विचारांवर विश्वास ठेवतात.”
शिंदे यांनी नव्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा देत सांगितले की, “कोळीवाडा आणि इतर भागांचा विकास हा प्राधान्याने केला जाईल. प्रत्येक नव्या सहकाऱ्याच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी आहे.”
शिवसेनेचा जनाधार वाढतोय; विविध जिल्ह्यांतील 14 गटांच्या प्रवेशामुळे शिंदे गट आणखी मजबूत होत असल्याचेही शिंदे यांनी अधोरेखित केले.
…..







