
विरोधकांकडे फुसक्या टिकल्या, आमच्याकडे मात्र ‘ॲटम बॉम्ब’, आगामी निवडणुकीत विरोधकांचे होणार ‘काम तमाम’
दिवाळी पूर्वसंध्या कार्यक्रमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांवर हल्ला
ठाण्यातील कोपरीकराना दिवाळीनिमित्त ‘स्वर दीपावली’ची भेट
ठाणे : “महाराष्ट्रात कितीही विरोधक एकत्र आले, आणि आमच्या ठिकऱ्या उडतील म्हणाले तरी त्यांचं हे सगळं वागणं म्हणजे ‘बोलाची कढी, बोलाचाच भात आणि तोंडाची वाफ!’ त्यांच्याकडे लोक नाहीत, फक्त फटाक्याच्या फुसक्या टिकल्या आहेत; पण आमच्याकडे आहे एकच ॲटम बॉम्ब, विरोधकांचा काम तमाम!” असा स्फोटक हल्ला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर चढवला. ठाण्यातील शिंदे यांच्या कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी काल दिवाळी पूर्वसंध्येला ‘स्वर दीपावली’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते.
शिंदे म्हणाले, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकला आहे आणि आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही भगवा फडकेल, असा पुनरुच्चार त्यांनी केला.
त्यांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बोलताना सांगितले की, “शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ दिलेली नाही. सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे आणि शेतकरी संकटातून सावरत आहे.”
शिंदे पुढे म्हणाले, “महापालिकेतील कर्मचाऱ्यांना वाढ दिल्याने आनंदाचे वातावरण आहे. एसटी महामंडळात २० वर्षांत पहिल्यांदा संप न होता एक लाख कर्मचाऱ्यांना तब्बल १०७ कोटींची वाढ देण्यात आली आहे. हे सरकार काम करतंय, फक्त बोलत नाही!”
स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्याने, “घोड मैदान जवळच आहे, त्यामुळे कोणाच्या ठिकऱ्या उडतील हे लवकरच दिसेल,” असा थेट टोला त्यांनी लगावला.
त्यांनी पुढे फटकारलं, “जे स्वतःच्या विचारांवर ठाम राहत नाहीत, अशा लोकांचा बँड जनता वाजवत असते. त्यांनी आनंद दिघे यांचा अपमान केला आहे. त्यामुळे ठाणेकर जनता त्यांचा बँड वाजवल्याशिवाय राहणार नाही! बाळासाहेब ठाकरे आमच्या हृदयात आणि आनंद दिघे आमच्या रक्तात आहेत,” असे जाहीर शब्दांत शिंदे म्हणाले.
येत्या निवडणुकांवर थेट इशारा देताना शिंदे म्हणाले, “काही लोक वर्षानुवर्ष घरात बसतात आणि निवडणुका आल्या की जनतेच्या दारात जातात. पण एकनाथ शिंदे आणि शिवसैनिक सातत्याने लोकांच्या दारात आहोत. महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे; ती काम करणाऱ्यांच्या पाठीशी उभी राहील आणि घरात बसणाऱ्यांना कायमचे घरात बसवेल!”
ठाण्याच्या जमिनीवर पुन्हा एकदा ठणकावून शिंदे म्हणाले, “मी सातत्याने जनतेच्या संपर्कात असतो, त्यांच्या घरात जातो, म्हणूनच ठाण्यात शिवसेनेचा भगवा झेंडा अभिमानाने फडकतो!” त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील राज्यात सगळीकडे त्यांचीच पुनरावृत्ती झालेली तुम्हाला दिसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांची पत्नी सौ. लता शिंदे, खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक, शिवसेना सचिव संजय मोरे, राम रेपाळे, ठाणे विधानसभा प्रमुख हेमंत पवार, लोकसभा संपर्कप्रमुख मनोज शिंदे, ठाणे जिल्हा महिला संघटिका सौ. मीनाक्षी शिंदे, माजी नगरसेवक संजय वाघुले, सुधीर कोकाटे, पवन कदम, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.









