
नवी दिल्ली | सर्वांगीण आरोग्य आणि निरामय जीवनाला प्रोत्साहन देण्याच्या भारताच्या नेतृत्वाचा एक सामर्थ्यशाली दाखला म्हणून, 21 जून रोजी आयोजित 11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाने (योग संगम) एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. देशभरातील सुमारे 50,000 संस्थांनी 21 जून 2025 रोजी सकाळी 6:30 to 7:45 वाजेपर्यंत होणारा योग संगम कार्यक्रम आयोजित करण्यासाठी नोंदणी करुन सामूहिक सहभागाच्या क्षेत्रात एक नवीन मापदंड प्रस्थापित केला आहे.
राजस्थानमधील सर्वाधिक म्हणजे 11,000 संस्थांनी योग संगम 2025 साठी नोंदणी करुन सर्व राज्यांमध्ये बाजी मारली आहे. या उल्लेखनीय सहभागापाठोपाठ तेलंगणाने 7,000 संस्थांची नोंदणी आणि मध्य प्रदेशने 5,000 संस्थांच्या नोंदणीसह आघाडी घेतली आहे.
यावर्षीची “एक पृथ्वी, एक आरोग्य साठी योग” या संकल्पनेतून एकता आणि निरोगी जीवनाचा सार्वत्रिक ध्वनी निनादत आहे. आय आय टी, आय आय एम आणि केंद्रीय विद्यापीठांसारख्या प्रतिष्ठित संस्था तसेच अनेक कॉर्पोरेट आणि खाजगी संस्था यामध्ये सक्रिय भाग घेण्यासाठी नोंदणी करत असून वैश्विक निरामयतेप्रति त्यांची वचनबद्धता प्रदर्शित करत आहेत.
यावर्षीचा हा योग सोहळा गेल्या अनेक वर्षांच्या योगदिनाच्या यशस्वी विकेंद्रित मॉडेलवर आधारित आहेत. आयुष मंत्रालय Yoga.ayush.gov.in/yoga-sangam या योग संगम पोर्टल द्वारे सार्वजनिक सहभाग वाढवत आहे:
योग संगम मध्ये भाग घेण्यासाठी काय करणे आवश्यक आहे:
- https://yoga.ayush.gov.in/yoga-sangam ला भेट द्या.
- तुमचा गट किंवा संस्थेची नोंदणी करा
- 21 जून 2025 रोजी सकाळी 6:30 ते 7:45 या वेळेत योग सत्र आयोजित करा
- अधिकृत प्रशंसा प्रमाणपत्र मिळविण्यासाठी कार्यक्रमानंतर सहभागाची माहिती अपलोड करा.
देशभरातील सुमारे एक लाखांहून अधिक ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रम आयोजित केला जाणार असून आयुष मंत्रालयाने नागरिक, संस्था आणि समुदायांना एकत्र येऊन भारताच्या या प्राचीन ज्ञान परंपरेच्या जागतिक महोत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे. एका आरोग्यमय आणि अधिक सुसंवादी जगासाठी आपण एकत्र चालू , एकत्र श्वास घेऊ आणि एकत्रितरित्या समृद्ध जीवनाकडे वाटचाल करूया.