
“प्रो बैलगाडा लीग लवकरच — महाराष्ट्राच्या वारशाचे जागतिकीकरण करण्याचा शासनाचा संकल्प”
“शेतकऱ्यांचा सन्मान, संस्कृतीचे संवर्धन आणि परंपरेला आधुनिकता देणे हेच आमचे ध्येय आहे.”
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे श्रीनाथ केसरी बैलगाडा शर्यत स्पर्धेचे बक्षीस वितरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न
मुंबई, ता, 18 : “बैलगाडा शर्यत ही महाराष्ट्राचा गौरवशाली वारसा आहे. ही परंपरा जगभर पोहोचवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. यासाठी पुढील कालावधीमध्ये प्रो बैलगाडा लीग सुरू करण्यात येईल. शेतकऱ्यांचा सन्मान, संस्कृतीचे संवर्धन आणि परंपरेला आधुनिकता देणे हेच आमचे ध्येय आहे.” असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित श्रीनाथ केसरी बैलगाडा शर्यत 2025 च्या बक्षीस वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी विविध स्पर्धांतील विजेत्यांना गौरवण्यात आले. परिसरात हजारोंच्या संख्येने उपस्थित शेतकरी, रसिक आणि चाहत्यांची उत्स्फूर्त उपस्थिती पाहून महाराष्ट्राच्या बैलगाडा संस्कृतीची लोकप्रियता स्पष्ट होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
श्रीनाथ केसरी बैलगाडा शर्यतीचे आयोजन डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी केले होते. जागतिक स्तरावर गिनीज रेकॉर्डची अपेक्षा शर्यतीला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादाचा उल्लेख करताना शिंदे म्हणाले, गर्दीवरून सांगू शकतो ही शर्यत गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होईल यात शंका नाही.” बैलजोड्यांची संख्या, चाहत्यांची उपस्थिती, रेकॉर्ड ब्रेकिंग सहभाग आणि थरारक स्पर्धा हाच या वर्षीचा श्रीनाथ केसरी बैलगाडा शर्यतीचे वैशिष्ट्य ठरले असे नमूद केले.
परंपरा, श्रद्धा आणि भविष्यातील योजना शर्यतींच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रेरणा, रोजगार आणि आर्थिक पाठबळ मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. “बैल हा शेतकऱ्याचा विश्वासू साथी आहे. बैलगाडा शर्यत म्हणजे मातीचा अभिमान. ती आपण जपलीच पाहिजे,” असे ते म्हणाले. त्यांनी पुढील काळात प्रो बैलगाडा लीग सुरू करण्याचा संकेत देत, योजनेच्या नेतृत्वाबाबत आयोजक चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या कार्यसंघाचे कौतुक केले.
शेतकरी कल्याण आणि शासन निर्णय संबंधित योजनांचा उल्लेख करताना शिंदे म्हणाले की, गोमातेला राज्यमातेचा दर्जा देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य. शेतकऱ्यांसाठी बांबू लागवड, मनरेगातून अनुदान आणि कृषी पायाभूत सुविधा यांसाठी अतिरिक्त प्रकल्प राबविण्यात येत आहेत.
बैलगाडा शर्यतीदरम्यान झालेल्या अपघातग्रस्त कुटुंबियांना ५ लाखांची आर्थिक मदत देण्याची घोषणाही त्यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराज, सैनिकांचा गौरव आणि देशभक्ती या प्रसंगी त्यांनी भारतीय लष्करासाठी शिबिर व रक्तदान मोहिमांचे उल्लेख करत देशभक्तीचा संदेश दिला. “सीमेवरील जवानांची सेवा म्हणजे राष्ट्रसेवा. त्यांच्यासाठी महाराष्ट्र सदैव तयार आहे,” असे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली आणि बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांची आठवण करून दिली. “ही मालक-नोकरांची पक्ष संस्था नाही; हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
तसेच यावेळी बैलगाडा शर्यतीतील विजेत्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते फोर्चूनर आणि थार गाड्यांच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले.







