
मुंबईत दरडप्रवण भागात राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षा जाळ्या बसविण्याचे काम तातडीने पूर्ण करावे. अतिधोकादायक ठिकाणालगत एसआरए, म्हाडा यांचे प्रकल्प सुरू आहेत अशा प्रकल्पांमध्ये अतिधोकादायक ठिकाणच्या रहिवाशांना सामावून घेण्याबाबत धोरण तयार करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.
कुर्ला विधानसभा क्षेत्रातील विविध समस्यांबाबत आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. यावेळी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. आमदार मंगेश कुडाळकर, दिलीप लांडे, उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव गोविंदराज, एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर, म्हाडाचे मिलिंद बोरीकर आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते.
याभागातील चुनाभट्टी येथे डोंगराळ भागात वारंवार दरड कोसळण्याच्या घटना होत असल्याने तेथील रहिवाशांचे पुनर्वसन करण्याबाबत आमदार कुडाळकर यांनी मागणी केली होती. त्याचबरोबर चांदीवली येथील मतदार संघात अशाच प्रकारचा भाग असल्याचे आमदार लांडे यांनी यावेळी सांगितले होते. मदत व पुनर्वसन विभागाकडे असलेल्या निधीतून मुंबईतील दरडप्रवण भागातील सुमारे ४२ झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा जाळ्या बसविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
अतिधोकादायक भागावर लक्ष केंद्रीत करण्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
अशा धोकादायक ठिकाणालगत म्हाडा, एसआरएचे प्रकल्प सुरू असतील तर त्या प्रकल्पांमधील काही घरांमध्ये अतिधोकादायक इमारतीत राहणाऱ्या नागरिकांना सर्वोच्च प्राधान्य देता येईल का याबाबत धोरण करण्याचे निर्देश यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी दिले. अशा धोकादायक ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांसाठी कायमस्वरुपी उपाययोजना करण्याचे श्री. शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले. कुर्ला येथील तकीया वॉर्ड भागात असलेल्या २० एकर जमिनीवरील घरांसाठी क्लस्टर योजना राबविण्याची विनंती यावेळी कतरण्यात आली. कुर्ला विधानसभा क्षेत्रातील रेल्वे हद्दीतील झोपडपट्टीधारकांच्या समस्यांबाबतही चर्चा करण्यात आली.
००००