
ठाण्यात श्री. एकनाथ भानुदास ढमाळ यांची सहा. संचालक व सरकारी अभियोक्ता पदावर नियुक्ती
ठाणे, 1 सप्टेंबर २०२५ –
महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने राज्यातील ३० अतिरिक्त सरकारी अभियोक्त्यांना पदोन्नती देऊन सहा. संचालक व सरकारी अभियोक्ता म्हणून नियुक्त केले आहे. या पदोन्नतीत ठाणे जिल्ह्यातील अतिरिक्त सरकारी अभियोक्ता श्री. एकनाथ भानुदास ढमाळ यांची निवड होऊन त्यांची नियुक्ती ठाणे येथे करण्यात आली आहे.
श्री. ढमाळ यांची २००२ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहा. सरकारी अभियोक्ता (गट-अ) म्हणून निवड झाली होती. त्यानंतर मुंबई, रायगड व ठाणे जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये त्यांनी शासनाच्या वतीने प्रभावीपणे कामकाज केले. प्रविण महाजन अटक व रिमांड कार्यवाही तसेच अजमल कसाब अटक व रिमांड प्रक्रियेसारख्या अत्यंत महत्त्वाच्या खटल्यांमध्ये त्यांनी शासनाची बाज यशस्वीपणे मांडली.
सन २०२१ मध्ये त्यांची अतिरिक्त सरकारी अभियोक्ता म्हणून पदोन्नती झाली. ठाणे व बेलापूर येथील उपन्यायालयांमध्ये काम करताना त्यांनी दोषसिद्धीचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढवले असून अनेक गंभीर खटल्यांमध्ये आरोपींना शिक्षा झाली.
आता सहा. संचालक व सरकारी अभियोक्ता म्हणून श्री. ढमाळ यांच्यावर ठाणे व पालघर जिल्ह्यातील कार्यालयीन प्रशासकीय कामकाज, अधीनस्थ सरकारी अभियोक्त्यांचे न्यायालयीन कामकाजाचे मार्गदर्शन व देखरेख, तपासी यंत्रणांना गुन्ह्याच्या तपासाबाबत अभिप्राय देणे, शासनाच्या विविध समित्यांवर कामकाज करणे, तसेच कायदेशीर सेमिनार आयोजित करणे अशा महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत.
श्री. ढमाळ यांच्या या पदोन्नतीमुळे ठाणे जिल्ह्यातील अभियोक्ता विभागाच्या कार्यक्षमता व न्यायदान प्रक्रियेतील प्रभावीपणात आणखी वृद्धी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.